राजेश बोबडे
प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा।
ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा।
भेद-कल्पना जाती रसातळा।
प्रार्थनेच्या मुशीमाजी।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेतून, ग्रामगीतेतून मानवाला सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. महाराज म्हणतात, ‘आपली सामुदायिक प्रार्थना म्हणजेच सामुदायिक जीवनाचे ज्ञान मिळविण्याची शाळा आहे. जगात अनेक हेतूंनी अनेक शाळा चालविल्या जात आहे. ब्रह्मविद्येच्या शाळा आहेत. व्यवहारविद्येच्या शाळा आहेत. प्रत्येक विद्येसाठी एकेक शाळा असते. त्यानुसार आपली सामुदायिक प्रार्थनासुद्धा एक शाळा आहे. अशा प्रकारची सामुदायिक भावना आम्हाला कशी मिळेल, सामुदायिकतेशी आमचा संबंध काय आहे, या गोष्टीचा विचार आम्ही केला पाहिजे.’
एकांतात जीवन घालविणाऱ्या माणसाचाही सामुदायिक जीवनाशी संबंध येत असतो. मग समाजात राहणाऱ्या माणसाविषयी बोलण्याची आवश्यकता काय? वर वर पाहता आम्ही कोणावर अवलंबून नाही असे आपल्याला वाटत असते, परंतु ही गोष्ट खरी नाही. आपल्या अंगावरील कपडय़ाचेच आपण उदाहरण घेऊ. आपण म्हणतो, मी कपडा बाजारातून विकत घेतला, पण जरा बारकाईने विचार केला तर कापूस पिकविणारा, वेचणारा, कातणारा, विणणारा, धुणारा अशा कितीतरी लोकांचे कष्ट आपल्या समोर येतात. या सर्वानी श्रम केले म्हणून आपल्या अंगावर कपडा आला.
मी ज्या घरात राहतो त्या घरासाठी बेलदार, सुतार, लोहार, मजूर इत्यादी लोकांचा सहयोग मी घेतलेला असतो. यावरून आपले जीवन परस्परावलंबी आहे, हा सिद्धांत निघतो. म्हणजेच परस्परांच्या मदतीशिवाय, सहकार्याशिवाय आम्ही जगात राहूच शकणार नाही, परंतु जेव्हा आपले घर तयार होते किंवा कपडा अंगावर येतो तेव्हा आपण या अनंत उपकारकर्त्यांना विसरून जातो आणि मी कोणाचे काही घेतले नाही, मला कोणाचे काही देणे नाही, असे म्हणतो. जीवनात आपल्याला अनंत वस्तूंची गरज असते. त्या अनंत वस्तू निर्माण करणारे कारागीर
आपले उपकारकर्ते असतात. या दृष्टीने विचार केला तर कोणताही माणूस आपला कुटुंबाबाहेरचा आहे असे आपल्याला मानून चालणार नाही. हे सारे आमच्या घरातले लोक आहेत. आमचे घर एक विशाल घर
आहे. आम्ही विश्व कुटुंबातले एक नागरिक आहोत.
rajesh772@gmail.com