संतमहात्म्यांच्या जवळील सेवक व अनुयायांमध्ये त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी स्पर्धा लागते. मालमत्ता व सत्ता हस्तगत करण्यासाठी त्या संतमहात्म्याच्या मरण्याची वाट पाहाण्यापर्यंत, त्यांचे कार्यच आपल्या नावाने लाटण्यापर्यंतही मजल जाते, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतभ्रमणात दिसले, म्हणून महाराज आपल्या वचनात म्हणतात,
स्वारथ का अंधा आदमी, क्या क्या न करता पाप है?।
वह दूसरों का खून करने तक करे संताप है।।
दिल में मेरे है आग, अब मैं क्या करुँ?।
अपने हि शत्रु बन गये, मारुँ उन्हें या मैं मरुँ?।।
‘जीवनयोगी’ या महाराजांच्या चरित्रग्रंथाचे लेखक जनसारस्वतकार सुदाम सावरकर यांनी महाराजांचे चरित्र समग्र ११ खंडांत लिहिले. त्यात महाराजांच्या निर्वाणप्रंसगीचे वास्तवदर्शन आहे. उत्तराधिकारी नेमण्यासाठी अनेक मठ, मंदिर, कुटुंब, सेवक, अनुयायी व संस्थांमधील तंटे सोडविण्यासाठी तुकडोजी महाराजांना मध्यस्थी करावी लागली होती. माणूस म्हटले की सत्तेचा मोह आलाच हा अनुभव गाठीशी असल्यामुळे आपल्या निर्वाणानंतर गुरुदेव सेवा मंडळातही उत्तराधिकारी होण्यासाठी संघर्ष होऊ नये म्हणून व्यक्तिपूजेच्या विरोधात असलेल्या तुकडोजी महाराजांनी कुणा एका व्यक्तीला उत्तराधिकारी घोषित न करता गुरुदेव सेवा मंडळाची धर्मदाय खात्याकडे रीतसर नोंदणी केली व ‘‘जो माझ्या विचारांशी एकरूप होऊन माझे कार्य, माझ्या संकल्पना पुढे नेईल, गुरुदेव सेवा मंडळाची पताका जगात फडकविण्याची प्रामाणिक ज्योत ज्याच्या हृदयात अहर्निश तेवत असेल मग तो सेवा मंडळाचा असो अथवा नसो, अशा ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणारी करोडो जनता हीच माझी उत्तराधिकारी आहे’’ असे स्पष्टपणे तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवले.
याबाबत महाराज म्हणतात, ‘‘गुरुदेव सेवामंडळ समाजाच्या सर्वागीण सेवेसाठी केलेली सुंदर रचना आहे. सर्व मानवजातीची मंगलमय साधना आहे. ज्या दिवशी व्यक्तिगत सुखाच्या प्रलोभनात गुंतून किंवा सेवेची भावना शिथिल पडून हे नि:स्पृह प्रचारक आपल्या स्थानावरून घसरतात किंवा आपले काम सोडून दुसऱ्याच मार्गाला लागतात, त्या दिवसापासून राष्ट्र नकळत धुळीस मिळते. कोणत्याही संस्थेत ज्या दिवशी सेवक, कार्यकर्ते व प्रचारकांत अधिकाराची अभिलाषा निर्माण होते त्या दिवशी संस्था रसातळाला जाऊ लागली असे समजावे. आम्ही उपाशी राहू, भीक मागू, परंतु जिवंत आहोत तोपर्यंत मंडळाचे कार्य चालवू, असे म्हणणारे लोक ज्या संस्थेत आहेत तीच संस्था जिवंत होय. असे म्हणणारे लोक कमी होऊ लागले की संस्थेच्या नाशाची अवस्था सुरू झाली असे समजावे. ‘तुका म्हणे नाही चालत तातडी। प्राप्त काळघडी आल्याविण।।’ याप्रमाणे जगामध्ये शेकडो वर्षांपूर्वी अनेक महान तत्त्वज्ञ, संत, महापुरुष झाले तरी त्यांच्या शिकवणुकीचा इच्छित परिणाम समाजमनावर झालेला दिसत नसल्याने तुकडोजी महाराज म्हणतात,
बीज हमनें बो दिये, धिरे-धिरे पनपतें रहेंगे।
बीज न बोये जाते खडकपर, मेरा मैं जानू।।
राजेश बोबडे