राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात श्रीगुरुदेव सर्वधर्मप्रार्थना मंदिर निर्माण केले आहे. येथे कोणत्याही धर्माला मानणारा आपली मनोवांच्छित प्रार्थना करू शकतो. ‘सर्वधर्मसमभावाचा वीट आलेल्यां’ना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची शुद्ध व्याख्या आपल्या विवेचनातून करून दिली आहे. महाराज म्हणतात, आकाशातून पाणी पडल्यानंतर ते जसे नदीनाल्याच्या रूपाने अनंत मार्गाने नेमके समुद्रासच जाऊन मिळते त्याप्रमाणे कोणत्याही धर्माची उपासना ही माणसाला त्या नित्य, शाश्वत जगदीश्वराप्रत घेऊन जाते. आज या जगात नाना धर्म-मते प्रचलित आहेत व प्रत्येक धर्मावलंबी हा आपल्या आपल्या धर्मास श्रेष्ठ समजतो व दुसऱ्या धर्माला विरोध करतो. यामुळे धर्माधर्मात भीषण प्रकारचे अत्याचार व भांडणे होतात. वास्तविक पाहता प्रत्येक धर्माचे सार एकच आहे. एकाच जगदीशरूपी सागरास जाऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजे धर्म होत. फार तर प्रत्येक धर्माच्या तपशिलात आचारसंहितेत देशकालपरिस्थितीनुसार भेद संभवू शकतील; परंतु त्यांच्या अंतिम उद्देशात मात्र समानताच दिसून येते.
प्रत्येक धर्म- मताचा साकल्याने व आपुलकीने विचार केल्यास आपल्या हे निदर्शनास येईल. परंतु मानव हा स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी या धर्ममतावरही स्वार झालेला आहे व जीवनातील इतर क्षेत्राप्रमाणे धर्मालासुद्धा त्याने आपल्या जीवन-संघर्षांत पराकोटीचे स्थान दिलेले आहे. देवपाटातील देवसुद्धा विकून खाण्यापर्यंत आमची मजल गेलेली आहे, मंदिरातून देवाच्या मूर्ती चोरल्या जाण्याच्या घटना आपण पाहातोच; तरीही दांभिकतेने धार्मिक म्हणवून घेऊन दुसऱ्या धर्माची निंदा करण्याचा आमचा स्वभाव मात्र कायमच आहे. भूत व वर्तमानकाळातील हा धर्मा-धर्माचा संघर्ष पाहिला म्हणजे प्रामाणिक माणसाला त्याचा उबग आल्याशिवाय राहत नाही. धर्मसहिष्णुतेशिवाय मानवतेचा विकास कदापि होणार नाही हे त्रिवार सत्य आहे. प्रत्येक धर्मप्रवर्तकाने त्या-त्या धर्माचा आविष्कार आपल्या अनुभवाच्या आधाराने केलेला आहे; इतकेच नव्हे तर त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले. परंतु त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनी मात्र आपल्या स्वत:च्या व जाती-संप्रदायाच्या स्वार्थासाठी त्याला बहिष्कृत स्वरूप आणल्याची पुष्कळ उदाहरणे देता येतील. त्यामुळे धर्मा-धर्मात अत्यंत भीषण स्वरूपाचे रणकंदन माजले आहे व हे कशासाठी म्हणाल तर – ‘उभे गंध लावावे की आडवे’ – याचा निर्णय करण्यासाठी. किती ही अवनती! जर अशीच स्थिती या विज्ञानयुगात चालत राहिली तर शेवटी असल्या धर्माना कोणीही विचारणार नाही.
सर्वधर्मभावाबद्दल महाराज आपला विशाल दृष्टिकोन त्यांच्या लोकप्रिय भजनातून स्पष्ट करतात.
सबके लिए खुला हैं, मन्दिर यह हमारा,
मतभेद को भुला हैं, मन्दिर यह हमारा,
आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी,
देशी-विदेशीयों को, मन्दिर यह हमारा
राजेश बोबडे