राजेश बोबडे
हजारो वर्षांपूर्वी भारताची जी संस्कृती होती ती निराळी आणि आजची निराळी. जगाने प्राचीन काळापासून आजपर्यंत एकसारखे जीवन जगावे असे कसे म्हणता येईल? गरिबांनी नेहमी गरीबच राहावे व श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे, असे म्हणता येईल का, असा प्रश्न गणराज्य दिनानिमित्त अभीष्टचिंतन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारतात. स्वराज्य प्राप्त होण्यापूर्वीची लोकांची मन:स्थिती, त्यांच्या धारणा, भावना, श्रद्धा-निष्ठा या आजही जशाच्या तशाच असाव्यात, असे सर्वाना वाटत असेल, तर तसे होणे शक्य नाही. त्या काळात काही भावना सुप्त असतील त्या आता प्रगट झाल्या असतील. जोवर त्यांना स्वानुभवाची जोड मिळणार नाही तोवर त्यात बदल होऊ शकत नाही. तेव्हा या जगात काय असावे, सत्ताधारी कसे असावेत, त्यांच्यात कोणता बदल व्हावा, हे सारे काळच ठरवेल. सत्ताधाऱ्यांच्या धोरणाचा प्रभाव देशातील लोकांवर पडतो हे खरे आहे. स्थित्यंतर होत असताना काळाशी सुसंगत असा बदल घडताना आपण मात्र समाजाचे उत्तम घटक बनून स्थिरता आणायचा प्रयत्न करावा!
प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली की देश सुधारलाच म्हणून समजा! सत्ता ही जलाशयाप्रमाणे आहे. पण त्यातून पाणी घेणे हे आपल्या भांडय़ाच्या कुवतीवर अवलंबून आहे. आपल्या देशात शुद्धाचरणी, सद्विचारी माणसे तयार झाली पाहिजेत. सर्व जण काळाबाजार, बेइमानी करणारे, असत्य भाषण, खोटी आश्वासने देणारे निघाले तर त्याला काय करणार? निवडणूक लढणे काही वावगे नाही. तो या देशाचा बाणाच ठरला आहे. पण त्यात बेइमानी, फंदफितुरी होऊ नये. आपल्या कर्तबगारीच्या व समाजसेवेच्या जोरावर माणसे निवडून जावीत. देशाच्या प्रगतीचा विचार सर्वानी करावा.
यातच गणराज्याचे कल्याण आहे. माझा पक्ष (राजकीय) की तुमचा पक्ष? पक्षांच्या विजयासाठीच देशाचा घात होताना आपण पाहातो! हे विलक्षणच, पण हे असे का असावे? हे अनाकलनीय आहे. राजकीय पक्षाच्या आणि जातीच्या मतलबासाठी सत्याचा बळी देण्याची वृत्ती योग्य नाही. माणसाने त्याचे अधिष्ठान सत्य, शुद्ध, निष्पाप ठेवावे. भ्रष्टाचाऱ्याला जाहीर शिक्षा द्यावी अथवा त्याचा तिरस्कार तरी करावा. तरच देश सुधारू शकतो. पक्षांधता रावणापासून आजपर्यंत या देशाला भोवली आहे. तेव्हा या गणराज्यामध्ये तरी आपली शक्ती सत्कार्याकरिता खर्च होवो अशी प्रत्येकाला प्रेरणा मिळावी व गणराज्य सफल नि सुफल करावे असे सांगून महाराज आपल्या राष्ट्रवंदनेत म्हणतात,
तन-मन-धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा।
सभी धर्म अरु पंथ पक्ष को, दिलसे रहे पियारा।
विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा।।
rajesh772@gmail. Com