आपल्या सर्व साध्याभोळय़ा सेवकांत एका विद्वान माणसाने फूट पाडली, त्यावरच त्याचे पोट भरते व प्रतिष्ठाही मिळते. त्याला ठेवावे तर संघटना जुळत नाही व काढावे तर आमच्यात तेवढा तज्ज्ञ कोणी नाही. या पेचप्रसंगाला उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : ज्याची विद्वता आम्हा संघटित सेवकांत फूट पाडत असेल व हे अनेकदा लक्षात आले असेल तर त्या विद्वान असलेल्या दुर्जनाला काढून टाकावे. एक दिवसही तो आपल्यात ठेवण्यालायक नाही. आम्ही आपले कार्य हळुवारपणे व सादगीने करू, निर्भय वृत्तीने करू, सत्यतेने करू त्यामध्ये आम्हा सर्वाना समाधान राहील. नाही तर रोजची एक चिंता निर्माण होईल. असे बोलण्यात, करण्यात कुशल माणसे पचवता येणे आम्हा साधारण लोकांना कठीण गोष्ट आहे. जसा चोर कितीही जपला तरी त्याचे लक्ष अगदीच बारीक असते व त्याच्या हातून चोरी होणारच. तसे हे विद्वान ज्यांना जिव्हाळा नाही, देशाचे भले व्हावे ही इच्छा नाही, समाज उन्नत करावा ही कळकळ नाही व कुणाचेही बिघडले ते नीट करून सोडावे ही वृत्ती नाही व आपल्याच ऐटीमध्ये नेहमी टोचून बोलणारे, शब्दांचा कीस पाडत राहणारे! जशी काही जनावरे उसाच्या बागेत फिरूनही पाचोळा अंगाला लागू देत नाहीत तसेच हे लोक असतात. यांना शोषण करण्याचा धंदा माहीत असतो. जिथे हे जातील तिथे फूट पाडणार.
बोलायला उत्तम. तोंडापुरती हाजी-हाजी करतील, पण आतमध्ये इंद्रावनाच्या फळाप्रमाणे असतात. हे कधीही कुणाला स्पष्ट बोलणार नाहीत. पण नेहमी आपल्याच डावावर राहतील. यांच्याने कष्ट होत नसतात. कोणी मेले तरी त्यांना पर्वा नसते. फक्त सभा भरली की आपली बाजू भाषणाने, चातुर्याने पुढे करून डाव खेळत असतात! तुम्ही त्याला ओळखले असेल तर तुमचे भाग्य उघडले समजा. त्याला मुळीच ठेवू नका. व अशा कुशलतेने त्याला काढा की त्याला कल्पनाही येणार नाही की आपण जाणार आहोत. नाही तर तो फार घोटाळा करून जाईल. वास्तविक हे विद्वानच नव्हेत. विद्वान तोच ज्याला चार लोकांचे फाटलेले जुळवता येते. मागासलेल्या समाजाला माणसांत बसवता येते. पांडित्यही उत्तम व हृदयही उत्तम अशी माणसे विद्वान म्हटली पाहिजेत. हा विद्वान जगण्याची कला शिकला असेल, जगवण्याची नाही. म्हणून तर याने तुम्हा सर्वात फाटाफूट केली आहे! तुम्ही उत्तम कार्य करणारे एक व्हा, त्याला मुळीच थारा देऊ नका. ही माणसे माणसांना खाणारे वाघ आहेत हे लक्षात ठेवा.
राजेश बोबडे