राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंढरपूर येथे आषाढी एकादशीला उद्बोधन करताना म्हणतात, ‘‘महाराष्ट्राचा वारकरी पिढय़ान्पिढय़ा पंढरीची वारी करत आला आहे. तो नुसताच चक्कर मारण्यासाठी येत नाही. तो येथून एक फार मोठा संदेश घेऊन जातो. आपल्या गावात स्वच्छता, सुंदरता, भाविकता वाढावी असा त्याचा प्रयत्न असला पाहिजे. गावात जर दुष्काळ पडला असेल तर त्याचा प्रतिकार करण्याची प्रेरणा येथे मिळाली पाहिजे.’’
‘‘पंढरी हे आपणा सर्वासाठी पुण्यक्षेत्र आहे. भगवान पांडुरंग अनेक युगांपासून जसाच्या तसा उभा आहे. तो म्हणतो, की दुबळय़ाला कधीच जय मिळू शकत नाही. दैवी शक्ती आणि आसुरी शक्ती यांचा झगडा सुरू आहे. या झगडय़ात सज्जन माणूस मेटाकुटीला आला आहे आणि हे सर्व पाहात भगवान पांडुरंग उभा आहे. याचा अर्थ असा नाही की, तो सज्जनाची साथ करणार नाही. तो धिराने, सबुरीने आपले काम करत असतो. ज्या ज्या वेळी माणूस पथभ्रष्ट, धर्मभ्रष्ट होत जातो तेव्हा तेव्हा निसर्गातील देवतासुद्धा रुष्ट होतात. भगवान पांडुरंगसुद्धा एक देवताच आहे. तिच्यावर आजच्या वातावरणाचा परिणाम होणार नाही, ही गोष्ट अशक्य आहे.’’
‘‘संतांची वाणी म्हणजे देवाचा आवाज. ती वाणी माणसाच्या पलीकडील असते. अनुभवातून स्फुरलेली असते आणि अपौरुषेय असते. तिचे स्वरूप चिरंतन असते. त्या वाणीतून तत्त्वज्ञानाचे प्रवाह जिवंतपणे वाहात असतात. म्हणूनच त्या वाणीत माणसाला जिवंत ठेवण्याचे सामथ्र्य असते. अशी दिव्य वाणी प्रकट करणारे संत संपले आहेत किंवा संपणार आहेत, असे मी मानत नाही. भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचे दैवत आहे. या देवाने, ‘या रे या रे लहान थोर, नाना याती नारी नर’ या भावनेतून सर्वाना जवळ केले आहे. नाना जातींतून या भगवंतांची भक्त परंपरा निर्माण झाली. देव आणि धर्म म्हणजे कुणा विशिष्ट संप्रदायाची किंवा बुवांची मिरासदारी नाही. हे येथे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले आहे.’’
‘‘असा हा भक्तांचा कनवाळू आणि सज्जनांचा कैवारी भगवान केवळ पंढरपुरातच नाही तो सर्वच ठिकाणी आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याची वस्ती आहे. तो जिथे तिथे व्याप्त आहे. याचा अर्थ तो पंढरीत नाही असा कोणी घेऊ नये. उलट तो विशेष रूपाने येथे आहे असे मानले पाहिजे. असे का याचेही कारण स्पष्ट आहे. संतांनी आपले जीवन येथे सेवेसाठी वाहिले. येथे देवाच्या दर्शनासाठी वाहिले. येथे देवाच्या दर्शनासाठी जे येतात ते आपला उद्धार करून घेतात. ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्व संतांनी ही पद्धत विचारपूर्वक चालविली आहे. ही परंपरा केवळ खिसेकापूंची पोळी भाजण्यासाठी नाही किंवा दुकानदारांची चार दिवस चंगळ व्हावी म्हणून नाही. संतांनी ही परंपरा एवढय़ासाठी चालविली की येथून मानवतेचा संदेश सर्वानी घरोघरी घेऊन जावा.’’ महाराज आपल्या भजनात म्हणतात.
चला हो! पंढरी जाऊ,
जिवाच्या जिवलगा पाहू।
भीवरे स्नान करुनिया,
संत-पद-धूळ शिरी लावू।।
राजेश बोबडे