१९५६ मध्ये त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळय़ात भारत साधुसमाजाच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या साधुसंतांसमोर चिंतन व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आजदेखील काही साधुसंत समाज-शिक्षणाचे आणि समाजोन्नतीचे फार मोठे कार्य करत आहेत. परंतु हेही विसरता येत नाही, की साधूंच्या नावावर अनेक बदमाश वेश पांघरून समाजात वावरत आहेत, ज्यांनी समाजजीवन सुधारावे ते स्वत:च भ्रष्टाचार पसरवत आहेत आणि समाजद्रोही लोकांना मोठेपणा मिळवून देत आहेत. या सर्व अनिष्ट गोष्टींना आळा घालणे गरजेचे नाही का? साधुत्वाचे पावित्र्य दूषित करणाऱ्यांची वेसण खेचता येईल, अशी व्यवस्था साधुसमाजाकडून व्हायला नको का? कोण कोणत्या पंथाच्या नावावर जगतो एवढय़ावरूनच त्याला महत्त्व न देता, त्याच्या आचारविचारांची कसोटीच महत्त्वाची मानली गेली पाहिजे, असे मला वाटते. कारण साधुत्व ही वृत्ती आहे, वेश नव्हे! मी कोणत्याही वेशाचा वा पंथाचा नाही.’’
‘‘जनताजनार्दनाची सेवा हाच माझा संप्रदाय! वयाच्या नवव्या वर्षांपूर्वीपासूनच ही दीक्षा मी घेतली आहे!’’ सनातनी वृत्ती सोडा, असे सांगून महाराज म्हणतात, ‘‘सृष्टी परिवर्तनशील आहे आणि गरज ही युक्तीची माता आहे. यामुळेच आवश्यक तेव्हा नवे पंथ, संप्रदाय निर्माण होत गेलेले आहेत. पण जुनेपणाचा अभिमान धरून बसणे हा मानवी स्वभाव आहे. असे असले तरीही, प्रगतीच्या दृष्टीने ही गोष्ट बाधक ठरते. पूर्वीच्या काळी देवाला वाहिलेले गुलाबाचे फूल चांगलेच होते; पण आज वाहण्यात येणारे नवे ताजे फूल हे त्याहून कमी दर्जाचे ठरेल काय? ‘जुने तेच सोने’ समजून कर्मठ मनोवृत्तीने आणि रूढीवादी भावनेने एककल्ली वागणूक इष्ट होणार नाही! ग्रंथांनी युगधर्म सांगितला तो उगीच नव्हे! एका वेळेचे यज्ञयाग आज नामसंकीर्तनात सामावले आहेत. वेद-उपनिषदानंतर गीता- भागवत् निर्माण होण्यालादेखील तितकाच अर्थ आहे.’’
‘‘केवळ जुन्याचाच अभिमान बाळगायचा असेल तर सर्वात जुने काय आहे, हे शोधावे लागेल आणि मग तुमचा हा एकही पंथ-संप्रदाय त्या कसोटीवर टिकणार नाही! शुद्ध तत्त्वज्ञान मात्र सर्वात जुने आणि नित्य नवे आहे; त्यावरच आपण सर्वानी दृष्टी केंद्रित केली पाहिजे आणि त्याच्या आधारे आजचे जीवन घडविले पाहिजे. साधुसंतांनो! तुम्ही कोणत्या संप्रदायाचे वा पंथाचे आहात, हे मी विचारत नाही. भारत साधुसमाजात याच, असाही हट्ट मी करीत नाही. परंतु हे लक्षात असू द्या की जर तुम्ही संघटित झाला नाहीत, हरिनामाबरोबरच जनजीवन सुधारण्याकडे लक्ष दिले नाहीत आणि देवाबरोबरच देशाकडे जागरूकतेने पाहिले नाहीत, तर लवकरच एक वेळ अशी येईल की या देशात मंदिरे शिल्लक राहणार नाहीत. मठांवरून ट्रॅक्टर चालविले जातील, साधुसंतांची देशद्रोही म्हणून धिंड काढली जाईल आणि ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्याला लाथेखाली तुडविण्यात येईल! ‘देव-धर्म सब झूठ’ म्हणणाऱ्या लोकांचे प्राबल्य या देशात झपाटय़ाने वाढत आहे आणि हे सारे साधुसंतांच्या उपेक्षेचेच फळ आहे!
राजेश बोबडे