श्रद्धा व भावना निर्माण होण्यासाठी आता प्रत्येकाला आपल्या घरीच आपली दिनचर्या शुद्ध ठेवावी लागेल आणि त्याद्वारे आपल्या संपूर्ण गावाचे चांगले संस्कार निर्माण होतील. सध्या सुधारणा फार जोरात सुरू आहेत. सुधारणेचे निरनिराळे प्रयोग शहरांत व खेडय़ांत वेगाने होत आहेत. परंतु माणूस सुधारण्याचे प्रयोग मात्र अजून तरी दिसत नाहीत, हेच या देशाचे दुर्दैव आहे असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सरकारी धोरणांवर टीका करताना म्हणतात, ‘‘दारूबंदीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. दारूबंदीचा अर्थ आता असा केला जात आहे की ज्याला दारू प्यावी असे वाटत असेल त्याला दारू पिऊ द्यावी. दारूबंदीमुळे सरकारचे फार नुकसान होते. चोरी करू नये हा कायदा आहे. उद्या असेही म्हणण्यात येईल की चोऱ्यांचे गुन्हे शोधून काढण्यात सरकारचा फार वेळ जातो व सरकारचे फार मोठे नुकसान होते, म्हणून यापुढे ज्याला चोरी करावयाची असेल त्याने खुशाल करावी. गुंडांचा उपद्रव मोडून काढण्यात सरकारचा फार मोठा खर्च होतो म्हणून गुंडगिरीही करण्याची मोकळीक सुरू होईल. अशी परिस्थिती सर्वत्रच निर्माण झाली तर प्रत्येकाला स्वत:चे घर सांभाळणेही कठीण जाईल आणि मग या पुण्यमय भारताची काय दशा होईल, याची कल्पनाच केलेली बरी.’’
‘‘माणसाची माणुसकी कायम रहावी म्हणूनच तर सुधारणा करायच्या असतात ना! राहायला घर व ही वास्तविक मूळ गरज. ही गरज भागविण्यासाठी सरकार फार धडपड करते. परंतु आजचा कारभारच असा बंदरछाप झाला आहे की माणूस सुधारण्याचे काम तर दूरच राहो परंतु माणूस कसा बिघडेल इकडेच विशेष लक्ष दिले जाते, असे खेदाने म्हणावे लागते. कल्पनेने रंगविलेल्या निरनिराळय़ा सुधारणा अमलात आणण्यापेक्षा साधुसंतांनी भविष्याची दूरदृष्टी देऊन स्वत:च्या अनुभवांनी सांगितलेला मार्ग आज तरी पुष्कळ सुधारणा करू शकेल.’’
‘‘आमच्या भागवतधर्माने भक्तीमार्गाद्वारे हीच शिकवण दिली आहे. तुझी इमानदारी कायम ठेव व मग बाकीची सुधारणा कर, ही आमच्या भागवतधर्माची शिकवण आहे. ज्या संतांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीने ही शिकवण आम्हाला दिली त्या संतांच्या शिकवणीलाच वारकरी सांप्रदाय असे म्हणतात. ‘संसार नेटका करावा’ ही आहे वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची मूळ शिकवण. ‘संसार करावा नेटका-दिसू न द्यावा फाटका – परि हरिनामाचा लटका असू द्यावा’ असे संत तुकारामांनी त्याचप्रमाणे ‘आधी प्रपंच करावा नेटका- मग परमार्थ साधावा विवेका’ असे श्री समर्थ रामदासांनी सांगितले आहे. म्हणूनच गीता, भागवत, साधू, संत यांची शिकवण हेच आमच्या देशाचे मुख्य धन आहे. गृहस्थधर्म सांभाळून भक्तीमार्गाद्वारे परमात्म्याशी तन्मय होणे म्हणजे वारकरी संप्रदाय!’’ महाराज ग्रामगीतेत लिहितात-
संसारी असोनि संत असती।
व्यवहारीं राहोनि आदर्श होती।
बुवा न म्हणवितांहि अधिकार ठेविती।
सद्गुरूचा॥
राजेश बोबडे