महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना गठित होण्यापूर्वी मध्यवर्ती सभेला ११ ऑक्टोबर १९४६ रोजी केलेले मौलिक मार्गदशन अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात ‘‘सेवक-सेवाधिकाऱ्यांनो, प्रचारकांनो, मोठे जबाबदारीचे काम तुम्ही स्वीकारले आहे’’. ते म्हणजे जिव्हाळय़ाने जनसेवा करणे. ती आत्मोन्नती करीत करावयाची आहे. मोठेपणा मिळवणे, एखादे पद प्राप्त करणे अथवा विशेष स्थान निर्माण करणे हे आपले ध्येय असू नये. जातीयतेची टरफले बाजूस सारून संस्कृतीची तात्त्विकता जागृत करणे हाच आपल्या कार्याचा गाभा असावा. ज्या वस्तुस्थितीवर मंडळ आधारलेले आहे तिचा पाया मध्यवर्ती मंडळात मजबूत करावयाचा असतो. ज्या पायावर उभारणी करावयाची तोच तकलादू असेल तर कार्य कसे टिकणार? यासाठी मध्यवर्तीचे कार्यकर्ते सदैव क्रियाशील-कर्मयुक्त असावेत. असे होईल तरच ते पुढच्या कार्याला पात्र होतील! साधनमार्गाने आत्मदशेकडे जाणारादेखील साधन सोडील व नुसत्या आत्मदशेच्या गोष्टी करील तर त्याचे जीवन निस्तेज होऊ लागते; हा धोका विसरता कामा नये! कार्यकारी मंडळी कसे जीवन जगतात, काय कार्य करितात व त्यांचे जीवन किती तात्त्विक आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रचारकांची चढती वाढती श्रेणी ही आपल्या जीवनात व कार्यात दिसली पाहिजे. सेवकापेक्षा ग्रामसेवाधिकारी हा चारित्र्याने अधिक वजनदार व अधिक तत्त्वनिष्ठ असला पाहिजे. त्याहून दहापटीने केंद्रसेवाधिकारी लोकसंग्रही व चारित्र्यसंपन्न असला पाहिजे.
केंद्रसेवाधिकारी हा चिठ्ठी निघाली म्हणून झाला, असे न वाटता, तो आमच्याहून खरोखरच पुढे आहे, आदर्श आहे असे ग्रामसेवाधिकाऱ्यांना वाटले पाहिजे. तालुका – सेवाधिकारी हा त्याहूनही उच्च असावा. अधिकाधिक वरचा असा आदर्शाचा क्रम स्पष्ट दिसला पाहिजे. पदाधिकारी मधुर भाषेने व कुशलतेने सर्वत्र प्रवेश मिळविणारा, सेवामंडळाच्या तत्त्वज्ञानात प्रवीण व सेवाकार्यात रत असा असला पाहिजे. त्याला सर्व विभागाची जाणीव असावी. कोणत्याही पदावर त्याला व्यवस्थित काम करता यावे. प्रांतसेवाधिकारी हा त्याहून अधिक गुणवान, शीलवान, विशाल भावनेचा व सर्व प्रांतात झळकू शकेल असा असावा. सर्व सेवाधिकाऱ्यांवर त्याचे नैतिक वजन असावे. कळकळीने, जिव्हाळय़ाने, कार्याच्या काळजीने पद्धतशीर पावले टाकून त्याने आपला उच्च आदर्श सर्वासमोर ठेवावा. त्याच्या कल्पना, त्याची साधने, त्याच्या सवयी व सहवासातील व्यक्ती देखील उच्च असणे फार महत्त्वाचे आहे. सर्व सेवाधिकारी हे सर्वप्रथम सेवकच आहेत हे विसरू नये. सेवा व प्रचार हे त्यांचे दोन पंख आहेत; त्यांनीच ते जनतेत भराऱ्या मारू शकतात. सेवाधिकारी व अध्यक्ष हे सेवामंडळाच्या तत्त्वाचे मूर्तिमंत्र प्रतीक बनले पाहिजेत. नुसती वरवरची कवायत उपयोगी नाही; त्यांच्या जीवनात हे तत्त्वज्ञान रुजले पाहिजे. मूळ तत्त्वज्ञान सोडून बहिरंग बोकाळले की नको ती सांप्रदायिकता निर्माण होते. सर्वच बाबतीत शिस्तीबरोबर पायाशुद्धता – तत्त्वाची दृष्टी हवी; नाहीतर काहीच अर्थ उरणार नाही !
राजेश बोबडे