श्रीगुरुदेव सेवा मंडळ का निर्माण केले याचे उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले : काही संस्था स्वार्थासाठी निर्माण करण्यात येतात. काही दुसऱ्यांच्या द्वेषासाठी तर काही दुसऱ्या संस्थांची कार्ये अपुरी वाटून ती पूर्ण करण्यासाठी काढल्या जातात. सेवा मंडळाच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मला माझ्या जीवनाकडे वळावे लागणार आहे. मला जग काय आहे, समाज कशाला म्हणतात हे कळत नव्हते तेव्हापासून मला भजनाचा व आत्मचिंतनाचा नाद होता. अनेकांच्या घरांतून भजनामुळे मी फारच लहानपणी लोकप्रिय झालो होतो. लोकांनी मला सर्वच ठिकाणी नेले. परंतु मला मात्र असे वाटत असे की मला या समाजाकडून काही सकारात्मक कार्य करवून घ्यावयाचे आहे. मला हे आढळले की लोक अज्ञानामुळे आणि विकृत परंपरेमुळे विचित्रपणास प्राप्त झाले आहेत. त्यांना माणुसकी कळत नाही. धर्माच्या नावाखाली स्वार्थाला खपविण्याची त्यांची वृत्ती मला सहन होईना. म्हणून मी भजनांना सामाजिक स्वरूप दिले.
मला असे दिसून आले की भजनामुळे लोकांच्या मनावर फक्त एक प्रकारची गुंगी चढते. ते कार्यप्रवृत्त होत नाहीत. ते तसे व्हावेत यासाठी मी व्याख्याने सुरू केली. त्यानेही कार्य होत नाही असे लक्षात येताच लोकांसाठी दिनचर्यात्मक कार्यक्रम सुरू करावा व त्यांच्याच भावनांना हाती धरून त्यांच्यात परिवर्तन कसे घडवून आणता येईल हे पाहावे म्हणून लोकरुचीनुसार ताल स्वरादींना प्राधान्य देऊन मी भजने करू लागलो. यज्ञ व सप्ताह करू लागलो. यज्ञात एकेका दिवशी १० ते १२ लक्ष लोक जेवू घालण्याइतके महान कार्यक्रम घडून आले आणि त्यांचे भाव लक्षात आल्यानंतर त्यांचेकडून पद्धतशीर कार्य करवून घेण्यासाठी संघटित प्रार्थनेने त्यांना एकत्र आणून त्यांचा एक समाजच निर्माण करू लागलो. तेव्हा माझ्या काही मित्रांनी स्वतंत्र समाजाची (आरती मंडळ) कल्पना काढली.
पुढे या उद्देशाने गुरुकुंज आश्रम व चिमूरसारख्या ठिकाणी एक आश्रम स्थापन करण्यात आला व प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू केला; परंतु त्या प्रार्थनेचा उगम वैयक्तिक भावनेमधून होता. श्री सद्गुरू आडकुजी महाराजांची स्तुती वगैरे यामध्ये असे व यांचे निमित्ताने समाज एका सूत्रबद्ध शिस्तीत आणावा असे वाटे. त्यातूनही पुढे जाताना हासुद्धा व्यक्तित्वनिष्ठ बुवाबाजीचा संप्रदायच पुढेमागे बनेल अशी जाणीव माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्या जाणिवेच्या जागृतीने श्री संत आडकुजी महाराजांची व्यक्तिपूजा मी तत्त्वापासून वेगळी केली.
व्यक्तित्वाचा बोजा न ठेवता तत्त्वपूजाच असावी म्हणून माझ्या मित्रांनी सुरू केलेल्या आरती मंडळांतून मोठय़ा प्रमाणातील सामाजिक कार्य, एका बुवाच्या नावानं न करता सामाजिक पद्धतीने करावे या उद्देशाने अकोल्याच्या चातुर्मास्यापासून गुरुदेव शक्ति आत्मबोध व तत्त्वज्ञान म्हणून मी मानले. १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढय़ाच्या कैदेतून सुटून आल्यावर श्रीगुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती केली.
राजेश बोबडे