राजेश बोबडे
भक्तिमार्गातील तपश्चर्येविषयी सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : अरे होय, भक्ती तर सारच आहे संसाराचे, जीवनाचे. पण तुझ्यात भक्तीच्या अगोदरचे कोणकोणते गुण आले आहेत? पतंग किडय़ाचे गुण तरी तुझ्यात आहेत काय? की जो दिवा पाहताच झडप घालतो नि मरेपर्यंत त्याला सोडीत नाही. भृंगाचा तरी गुण आहे का तुझ्यात? की, प्रेमाच्या अनावरतेमुळे जो स्वत:ला कमळात गुरफटवून घेऊन वेळकाळ विसरतो व स्वत:लाही विसरून जातो, मृत्यूलासुद्धा भीत नाही.
किडय़ाफकडय़ांचेही ज्यांत यित्कचित् गुण नाहीत त्यांत माणुसकी तरी कुठली येणार? आणि खरेच, तुझ्यात माणुसकीची लक्षणे (गुण) काय आहेत? मला सांग. सर्वात मामुली गोष्ट म्हणजे स्वयंसेवकपणा. तुझ्यावर जर कोणी लाखो रुपयांचे भांडवल सोपवले, किंवा आपल्या घरच्या तरुण मुलींपासून तो म्हाताऱ्या बाईपर्यंत सर्वाची इभ्रत तुझ्याजवळ दिली तर ‘एवढे तू अवश्य सांभाळशीलच. प्राण गेला तरी बेइमानी करणार नाहीस’ इतका तुझा भरवसा जनता करू शकेल काय?
असे प्रश्न महाराज विचारतात व म्हणतात :
बरें, तुझ्यात साधारण नोकरीचा तरी गुण आहे काय? की, मालकाने केलेला हुकूम जसाचा तसाच तिखटमीठ न लावता समंजसपणाने अमलात आणून, जेवढे मालकाचे तेवढेच असामीचेही भले तू सांभाळले आहेस काय? की केलेस ‘मालक से नोकर सवाई’ आणि म्हणतात ना ‘घोडय़ापेक्षा जिनच उडतो फार!’ निदान त्यातून भलाई तरी कमावली आहेस काय? हेही सोडा – मित्रत्व तरी तुला कळतं काय? आपण ज्या लोकांत राहतो ते आपल्यापेक्षा जास्त गुणवान असल्यास त्यांचे दास होऊन गुण घ्यावेत आणि ते गुणभ्रष्ट असले तर त्यांना आपलेसे करून घेऊन शहाणे करावे, एवढे तरी शिकलास का? बरे सोड तो दुसऱ्यांचा संबंध. आपल्या घरची व्यवस्था आपणास चांगली करता येते एवढे तरी अनुभवले आहेस काय? आणि गृहस्था! यातून एखाद्याही गुणाचा जर तू साथी नाहीस तर तुला ईश्वराने का जवळ घ्यावे? आणि ‘हरिभक्ती सोपी आहे’ असे म्हणण्याचा तुला अधिकार तरी आहे का बाबा?
महाराज आपल्या भजनात म्हणतात :
भक्ती कुणाची करिता, भरभर फिरता ।
लाभे फल का कधितरी हाता? ।।
चुकतची गेले देश विसरुनी,
केली मानवतेची हानी ।
दगडावरती घालुनी पाणी,
बनली निष्क्रिय ममता ।।
धर्महि नव्हता, देशही नव्हता,
लाभे फल का कधितरी हाता? ।
भक्ती म्हणजे प्रेमचि होते,
देव देश हे भिन्न न जेथे ।।
rajesh772@gmail.com