गोपालकाल्यासारखे धार्मिक समजले जाणारे कार्यक्रम आपण वर्षांनुवर्ष करीत आहोत, त्यांचा उद्देश जाणून घेतला पाहिजे; तरच यांचा उपयोग. एकीकडे देव नि दुसऱ्या बाजूला असुर यांनी समुद्रमंथनातून चौदा रत्ने काढल्याचे आपण ऐकतो. सध्याच्या समुद्रमंथनांतून आम्हाला आता ‘लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा’ अशी रत्ने नको आहेत. लक्ष्मीऐवजी आमच्या भूमीचा सवाल आज सुटायला पाहिजे. पारिजातकाऐवजी अधिक आज धान्याची गरज आहे. अन्यायाची चीड व सत्याची चाड असणाऱ्या लोकांची शक्ती संघटना वाढवून राष्ट्राचे भाग्य उजळले पाहिजे. भगवान श्रीकृष्णानेसुद्धा हेच केले. गोपालांना जमवून काला करण्यात त्याचा हाच हेतू होता. कृष्णाच्या घरी दहीदूध व लोणी मिळत नव्हते की काय? त्याच्या घरी नऊ लाख गायी होत्या म्हणून जे पुराणिक सांगत आहेत त्या सर्वच गायी भाकड होत्या काय ? मग त्याचा ‘काला’ करण्यात हेतू काय असावा ? काला हे एक निमित्त होते. सर्व सात्त्विक जनांना एकत्र करून संघटितपणे कार्य करण्याची स्फूर्ती देणारा तो मार्ग होता. सर्वाना वर आणण्याचे साधन म्हणून श्रीकृष्णाने त्याचा उपयोग केला. पंढरपुरास होणारा काला संतांनी याच दृष्टीने सुरू केला होता; पण आज काय स्थिती आहे? लोक काल्याचा कण, दहीहांडीचा शिंतोडा नि लाही मिळावी म्हणून हजारोंना धक्के देत पुढे धसतात; हांडक्यात हात घालून खायला मिळाले की ते मोठय़ा आनंदाने हात जोडून म्हणतात – ‘हा : हा ! इठ्ठला, धन्य लीला हाये रे बापा तुही !’ पण त्या विठ्ठलाच्याच मानवी रूपातील शंभर मूर्तीना धक्के व लाथा लावीत आल्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही. त्या गर्दीत कोणी चेंगरून मेला तरी पर्वा नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा