राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भूमिका घ्यावी म्हणून मुंबईतील लोहव्यापारी श्रीमंत पांडुरंग बोबडे यांनी मुंबईत महाराजांचा दौरा आयोजित केला. प्र.क.अत्रे, स.का.पाटील यांना सोबत घेऊन महाराजांनी राज्यभर जनजागृती केली. द्विभाषिक राज्याच्या निर्मितीबद्दल एका तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांशी बोलताना, ‘‘सध्याचे नेते आपल्याच मनाचे आहेत, जनतेच्या नाही.’’ असे महाराज (नेहरूंचे नाव न घेता) म्हणाले होते. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करल्यामुळे १९६० साली नेहरूंना शिवाजी पार्कवर संयुक्त महाराष्ट्र स्थापनेची घोषणा करावी लागली. पण निव्वळ अस्मितावाद मात्र नेहरूंप्रमाणेच महाराजांनाही अमान्य होता. ते कसे?
महाराज म्हणतात : ‘‘महाराष्ट्राकरिता जीव देण्यास तयार असणाऱ्या व्यक्तीच्या भावना त्याच दिशेनं उचंबळून येतील हे स्वाभाविक आहे. परंतु हा आकुंचित अभिनिवेश आम्हाला पचवता आला पाहिजे. एका विचारानं भारावलेल्या व्यक्तीला विशाल दृष्टीनं पाहता आलं पाहिजे. भारतात आमचा महाराष्ट्र गाजता असावा, हे म्हणणं रास्त आहे; पण एवढासा तुकडाच काय, संपूर्ण भारतच ‘महा’राष्ट्र बनला पाहिजे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखोबा, रामदास स्वामी अशा अनेक सत्पुरुषांनी महाराष्ट्राच्या भूमीवर राहूनही सामुदायिक धर्म स्थापन केला; एक नवी सृष्टी उभारली. ते नुसत्या महाराष्ट्राचे नव्हते. ‘आमुचा स्वदेश। भुवनत्रयावरी वास’ ही तुकोबांची भूमिका होती. ‘हे विश्वचि माझे घर’ या धारणेनंच ज्ञानेश्वरी सांगितली गेली. ‘दास डोंगरी राहतो चिंता जगाची वाहतो’ ही विशाल भावना रामदासांनी अंगीकारली होती. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे महाराष्ट्रीयांचे वा महाराष्ट्राचे गोडवे गाणाऱ्या संतांना विशिष्ट जातीस उत्तेजन द्यायचं नव्हतं. त्यांना सामुदायिक वृत्तीची माणसं हवी होती. शिवरायांच्या नसानसांत संतांच्या त्या विशाल धर्माची जाज्वल्य प्रेरणाच नांदत होती. त्यांची इच्छा विशिष्ट जातीचा एक गट बनून राहावा ही मुळीच नव्हती, तर ही संपूर्ण मानवजात त्यांना आपली दिसत होती. आम्हाला नुसता महाराष्ट्रच घेऊन बसायचा नाही, तर हा भारतच ‘महा’राष्ट्र बनवायचा आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये सबंध देश कसा सामावू शकेल याचा विचार करावयाचा आहे. आज देशात करोडो माणसं आहेत, पण जबाबदारीनं कर्तव्य करणाऱ्यांचा तोटा पडला आहे. श्रीगुरुदेव सेवामंडळाचा मानवतावादी लोंढा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडीत पसरत आहे, तो माणसांना माणूस बनविण्यासाठीच! सध्या आम्ही विदर्भ, मराठवाडा, मुंबई यांना तुकडे तुकडे मानतो. पण आमच्यात जर सामथ्र्य असेल तर कधी ना कधी तरी आम्ही सर्वाना एका विचारात आणू शकू. प्रत्येकानं कष्टाळू वृत्तीनं राष्ट्राचं वैभव वाढवलं पाहिजे. अशा रीतीनं प्रत्येक माणूस महान बनेल तर राष्ट्र ‘महा’राष्ट्र होईल!’’
महाराज भजनात म्हणतात :
कर महाराष्ट्र, हा एक भूषवि भारता।
शोभु दे,रंगु दे तुझी पुरातन प्रथा।।
– राजेश बोबडे