त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळय़ात ४ ऑगस्ट १९५६ रोजी भारत साधुसमाजाने आयोजित केलेल्या संत संमेलनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित होते. महाराज कोणत्याही पंथाचे नसल्याने ते साधू होऊ शकत नाहीत, म्हणून या वेळी महाराजांना काही साधूंनी विरोधही केला. महाराज म्हणतात, ‘‘भगवान रामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्व आदर्श राजांच्या राजवटीमागे साधुसंतांचे तप होते. राज्याला मार्गदर्शन करण्याची, शासनालाही अनुशासित करण्याची साधुसंतांची परंपरा थेट ऋषिकालापासून आहे. परंतु ही साखळी विशेषत: ब्रिटिशकाळात विस्कळीत झाली. देवभक्तांच्या अंगावर देशभक्तीच्या नावाने काटे येतात तर देशभक्तांना देवभक्तीचे वावडे असल्याचे दिसते. वास्तविक देवाच्या लेकरांचा समूह म्हणजे देश! व्यक्ती म्हणजे ईश्वराच्या मूर्ती! देशधर्माची संस्कृती साधुसंतांनीच आचार-विचारांनी टिकवून ठेवली आहे. तीच परंपरा यापुढेही सुरू राहावी म्हणून ‘भारत साधुसमाज’ आकारास आला आहे.
महाराज म्हणतात, ‘‘साधुसमाजात अनेक संप्रदाय एकत्र आले आहेत; परंतु हा समाज संप्रदायवादी नाही. प्रत्येक संप्रदाय आपल्या ठिकाणी उत्तम आहे; पण तो आपल्या मूळ शुद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे चालणारा असला पाहिजे हेच साधुसमाजाचे मत आहे. सर्व संप्रदायांना संघटित करून त्याद्वारे आध्यात्मिक विकास घडवावा आणि देशाचा नैतिक स्तर उंचावून व्यवहारशुद्धी साधावी, या हेतूनेच भारत साधुसमाजाची स्थापना झाली आहे. परंतु आज एकांगी भावना वाढून त्यात जमीन-अस्मानाचे अंतर पडले आहे. परिणामत: जो साधुसमाजाला वरदानरूप व वंदनीय होता तोच आज लोकांत भारभूत व निंदनीय ठरत आहे. ‘जंगलजेट’ म्हणून रस्तोरस्ती त्याची टिंगल केली जात आहे!
साधूंना निंदास्तुतीचे काही महत्त्व नसावे, हे मान्य आहे. परंतु त्याबाबत आत्मनिरीक्षण करणेदेखील आवश्यक नाही का? तुमचे उच्च तत्त्व लोकांना आकलन न झाल्याने त्यांनी निंदा केली तर ते दूषणावह नव्हे. परंतु तुमच्या तत्त्वभ्रष्टतेची निंदा होत असेल तर ती विचारात घ्यायला नको का? लोकांना कष्ट करूनही उपास घडत असतील आणि साधू लोक मिष्टान्नाचे भोग उडवीत असतील तर ते कितपत योग्य आहे? लोक नाना दु:खांनी होरपळत असतील आणि साधू शांतिमंत्र म्हणत बसतील तर ते योग्य ठरेल काय? समाजात भयानक भ्रष्टाचार वाढला असता आम्ही तिकडे दुर्लक्ष करून ‘सर्वब्रह्म’ म्हणत बसलो तर काय उपयोग? सात हजार मैलांवरून येऊन ख्रिश्चन प्रचारकांनी आमच्या देशातील मागासल्या लोकांची सेवा करावी आणि आम्ही मात्र सर्वश्रेष्ठ धर्माचा घोष करत आपापल्या गाद्या सांभाळत बसावे; कोण मोठा यावरून भांडत राहावे, हे किती लांच्छनास्पद? अन्नवस्त्रावाचून तडफडणारे, अन्यायाखाली दडपलेले लाखो लोक मानवतेपासून परावृत्त होत असता आम्ही आपल्या मठ महंतीच्या इस्टेटीसाठी झगडत राहावे; ‘अहंब्रम्हास्मि’ म्हणत देवावर हवाला टाकून मोकळे व्हावे; हे सर्वथैव निंद्य नव्हे काय?
– राजेश बोबडे