मानवाने विज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली तरी त्याला अध्यात्माची जोड नसेल तर विज्ञानच मानवाला गिळंकृत करेल, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मत होते. ते म्हणतात, ‘‘आता जगाची प्रगती मोजणे कठीण जाणार नाही. आज जगात जे अस्थैर्य निर्माण झाले आहे, त्याला कारण आसुरी प्रवृत्तींचा प्रभाव हेच आहे. आज आपण विज्ञानाच्या प्रगतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी त्यामुळे जगाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली असे म्हणता येणार नाही.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराज म्हणतात, ‘‘विज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेल्या राष्ट्रांकडे बघा. सर्वात जास्त लोभी व नतद्रष्ट राष्ट्रे हीच असतात. ज्या राष्ट्रातील विज्ञान अणुबॉम्ब निर्माण करून अन्य राष्ट्रांचा विध्वंस करू इच्छिते त्या राष्ट्रातील सभ्यता व ‘मानवीय मूल्ये’ विकसित झाली आहेत, असे कोण म्हणू शकेल? हीच विध्वंसात्मक नीती आजच्या विज्ञानाची एकमेव फलश्रुती आहे, हे निदर्शनास येते. मी विज्ञानविरोधी नाही. उलट माझे असेच मत आहे की हे विज्ञान अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे. परंतु जोपर्यंत या विज्ञानाचा उपयोग मानवमात्राच्या कल्याणासाठी होत नाही, तोपर्यंत ते विज्ञान त्याज्यच ठरते. सोन्याची सुरी आहे म्हणून तिला उरात खूपसून घेण्याचे शहाणपण कोणी करणार नाही! तलवार चांगली आहे, परंतु ती जर वापरता आली नाही तर माणूस स्वत:च स्वत:ची मान कापून घेतल्याशिवाय राहील काय? तद्वतच विज्ञान चांगले की वाईट हे ठरविणे, त्याचा उपयोग करणाऱ्यांवरच अवलंबून आहे. विज्ञान जर मानवमात्रांचे मित्र झाले तर त्यायोगे मानवाची उन्नती खात्रीने होईल. परंतु आज असे आहे का? याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल.’’

‘‘आज आम्ही विज्ञानाची कास धरून विमानाने आकाशात कितीही दूर गेलो तरी आमची दृष्टी घारीप्रमाणे तेथूनही आपल्या भक्ष्यावरच स्थिरावलेली असेल तर त्या उंच जाण्याला काहीच अर्थ उरणार नाही. जोपर्यंत मानवात मानवी मूल्यांचा उदय होत नाही, तोपर्यंत विज्ञानातील उन्नती बालिशवृत्तीचीच निदर्शक राहील. आपला देश फार प्राचीन काळापासून मानवी मूल्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय ऋषी-मुनींनी व संतश्रेष्ठांनी भारताला जी जीवनदृष्टी दिली तीत मानवी जीवनाची शाश्वत व अपरिवर्तनशील तत्त्वे समाविष्ट आहेत. त्यांचा हाच विचारदीप आज आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला थक्क करत आहे. ‘मी आणि माझे’ च्या ऐवजी ‘तू आणि तुझे’ हा भारतीय विचारसरणीचा पाया आहे. या पायावरच भारतात अध्यात्माची भव्य व अभंग इमारत रचली गेली. महाराज आपल्या भजनात म्हणतात..

अध्यात्म और विज्ञानके, संयोग से सब हो सुखी।
सहयोग-समता से यहीं, सृष्टी करें हम स्वर्ग की।।

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhar combination of spirituality and science rashtrasant tukdoji mahara amy