राजेश बोबडे
भगवान बुद्धांच्या शिकवणीला आचरणाची जोड देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आजदेखील कुणी फारसे शिक्षण न घेताही आपले डोळे उघडे ठेवून जगात वावरेल आणि दृश्यादृश्य प्रत्येक गोष्टीतून काही शिकेल तर तोसुद्धा भगवान बुद्ध गेले त्या मार्गाने जाऊ शकेल. ग्रंथाचे माहात्म्य मनुष्याला विचार शिकविण्यापुरतेच मर्यादित असते. जर माणसाला प्रत्येक गोष्ट समजून घेण्याइतपत पात्र व्हावयाचे असेल तर त्याला ग्रंथाचा गुलाम होऊन चालणार नाही.
आपला अनुभव ग्रांथिक अनुभवाशी जुळतो की नाही हे शास्त्रप्रचीतीने, आत्मप्रचीतीने, गुरुप्रचीतीने पाहून साक्षात्काराचा अनुभव घ्यायला मात्र त्याने विसरू नये. हे सर्व बुद्धांनी आपल्या जीवनात केले. भगवान बुद्धांनंतर ज्ञानी वा महात्मे झालेच नाहीत असा याचा अर्थ नाही. परंतु बरेचसे लोक परंपरागत ग्रंथांवरून संशोधन करत राहिले; म्हणूनच आजदेखील ग्रंथाचे गुलाम होतात. या अध्ययनात काळाची दृष्टी नाही. पूर्वजांनी ग्रंथमंथन केले आणि त्यातील सार काढून डोळस परंपरा पुढे ढकलली. परंतु देश, काल, स्थितीच्या मर्यादांनी त्या परंपरेला समाजापासून इतके दूर नेले की, लोक त्या गोष्टींना एक तमाशाच समजू लागले आहेत. चमत्कारांनी भरलेली पुराणे रोज वाचली जातात. मालमसाला टाकून त्या ग्रंथांचा नाश केला जात आहे. हा अंधानुकरणाचाच परिणाम नव्हे तर काय?’’
‘‘भगवान बुद्धांनी मानवी कसोटी आणि शक्तीवर जोर दिला. विश्वकुटुंबी होण्यासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही दृष्टी त्यांनी आपल्या कार्यात ठेवली. जगाला आज त्याच दृष्टीकडे वळले पाहिजे. मानवांच्या कर्तव्याचा आज तरी हाच मार्ग असू शकतो. आपल्या मागून आपल्या शिष्यपरिवारात गडबडघोटाळे होणार आहेत, याची जाणीव बुद्धांना होती. स्वत:ला गुलामीवृत्तीत जखडून ठेवणे आणि व्यक्तिनिष्ठता, अशी कारणे घोटाळय़ांच्या मुळाशी असू शकतात. बुद्धांच्या नंतर जी गति आणि मति सत्तेच्या रज्जूत जखडल्याने झाली तीच गति आणि मति सत्तेच्या रज्जूत जखडून तेथेच वाढणाऱ्यांची- जगणाऱ्यांची आज झाली आहे आणि होणार आहे. याच कच्च्या दुव्याला दूर करण्याचा प्रयत्न गत महात्म्यांनी केला; परंतु लोक ही गोष्ट समजू शकले नाहीत व म्हणूनच त्यांनी ते महात्मे भगवान बुद्धांच्या विरुद्ध असल्याची हाकाटी पिटली. परंतु ही हाकाटी व्यर्थ असल्याची आमची स्पष्ट धारणा आहे असे सांगून महाराज म्हणतात, आजदेखील आम्हाला बुद्धांची बुद्धी समजून घेऊन आमच्या भारतातच नव्हे तर साऱ्या विश्वात ती समजावून देण्याची आवश्यकता आहे. हे सारे समजून-उमजून आम्ही भगवान बुद्धांच्या ज्ञान-धारणेला मानतो. बुद्ध आत्मब्रह्म मानत नव्हते, एवढय़ासाठी आम्ही भगवान बुद्धांची ज्ञानधारा मानायची किंवा टाळायची असे नाही. आत्मब्रह्म तर सर्वच मानत होते- जाणत होते. पण बुद्धांचा आत्म-ब्रह्मभाव समाजोत्थानाशी निगडित होता. त्यांचा आत्मब्रह्मभाव केवळ मंदिरनिष्ठ, ग्रंथनिष्ठ नव्हता; त्याचे अधिष्ठान सेवानिष्ठ होते.