राजेश बोबडे

कोणतेही राष्ट्र कुणाच्या वैयक्तिक मालकीचे न राहाता ते सर्वाच्या हक्काचे म्हणजे प्रजासत्तात्मक असावे असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उदयोन्मुख भारताच्या विकासवाटा दाखवताना म्हणतात, ‘मंदिरावर हक्क दर्शनोत्सुक लोकांचा आहे; कोणत्याही विशिष्ट जातीचा नाही. देव भावाचा भुकेला आहे असेच सर्व संतांनी सांगितले आहे, तो कोणत्याही जातीचा बांधील नाही. गुणकर्मविचारापेक्षा जातिपंथादिकांना विशेष महत्त्व देऊन त्या आधारावर उच्चनीचपणाची कल्पना पक्की करणे हे राष्ट्रासाठी फार घातक आहे. या सर्व भावना लोकांच्या हृदयात रंगवून त्या व्यवहारात खेळविल्याशिवाय देशात भूषणावह परिस्थिती निर्माण होणार नाही.’

महाराज देशातील प्रभावशाली घटकांना उद्देशून म्हणतात, ‘पंडितांनो देश- काल- परिस्थिती पाहून जनतेला आपला मार्ग सांगा. आज जातीयता घालवून संघटितपणे कर्तव्यतेज दाखविण्याचे दिवस आले आहेत, हे लोकांना पटवून द्या. आणि त्यांच्या भावनेत असा जोश निर्माण करा की तुमचा धर्म तुम्ही प्रसंगी आहुती देऊनच राखू शकता, फक्त देवपूजेने नव्हे. तरुणांनो! धर्म हा मेल्यावर मोक्ष मिळेल म्हणून आचारावयाचा नसतो; तर देश स्वातंत्र्याने नटविण्याकरिता, आदर्शता आणण्याकरिता आणि समाजाची धारणा टिकविण्याकरिताच तो असतो. ईश्वरभक्ती हे एक साधन आहे, पूर्णता नव्हे. भक्तीच्या विकासाबरोबर ईश्वराची पूर्ण व्यापकता लक्षात येऊन जीव स्वत:बरोबरच समाजालाही पूर्णत्वाकडे नेत असतो. दुसऱ्यांच्या सुख-दु:खांचा विचार न करता आपली श्रीमंती आपल्याचकरिता आहे, असे समजणे चुकीचे आहे. ती राष्ट्राची संपत्ती आहे व तिची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी विश्वस्त या नात्याने तुमच्यावर सोपविली गेली आहे.’

ते म्हणतात, ‘महिलांनो! सामुदायिक प्रार्थनेत आपल्या भगिनींना जागृत व संघटित करून त्यांच्यात सीता, सावित्री, द्रौपदी व राणी लक्ष्मीचे तेज निर्माण करा; संततीसही तसेच शिक्षण द्या. तरच या संघर्षांच्या काळात टिकून राहाल. यापुढे परावलंबी राहून अब्रूनिशी जगता येणार नाही.’विद्यार्थ्यांना सल्ला देताना ते म्हणतात, ‘स्वत:सह आपल्या देशाच्या उन्नतीला व स्वातंत्र्याला पूरक होईल, अशी विद्या शिका, नाही तर तिचे काहीही प्रयोजन नाही. आपण शिकून सुसंस्कृत आणि सुशील झालो पाहिजे; निव्वळ सुशिक्षित नव्हे, ही खूणगाठ बांधा आणि आपल्या राष्ट्राचे तेजस्वी सैनिक व प्रामाणिक स्वयंसेवक व्हा! माझ्या प्रिय भारतवासीयांनो, यापुढे जसे तुम्ही वागाल तसेच तुम्ही जगाल, ही गोष्ट पक्की ध्यानात असू द्या! असा उपदेश करून महाराज आपल्या भजनात म्हणतात,

स्वातंत्र्याचा पंचमहोत्सव हर्षांने होऊ दे।
जन-मना! पाय पुढे जाउ दे।।
उत्साहाने चढाओढ कर, उद्योगी व्हावया।
भुषवी देश अन्न-धान्यी या।
कष्ट कराया शिक तरुण-मन देशकार्यी द्यावया।
तुकडय़ादास म्हणे यासाठी, मरू अणि जन्मू दे।।

rajesh772 @gmail.com