राजेश बोबडे
माणसाला सर्वात मोठा सात्त्विक अहंकार स्वत:च्या पवित्रतेचा आणि निरपेक्षतेचाच असायला हवा असतो. त्यायोगे त्या अहंकाराचा परिणाम लोकांत आत्मोन्नती करण्यासाठी आणि व्यासनाधीनता सोडण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठीच होत राहील. परंतु असा अहंकार मुळीच नको की, जो अवास्तव असेल, परावलंबी असेल किंवा दुर्गुणांना उत्तेजन देणारा असेल. असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘विस्तीर्ण रानात एकटेच पडले असता वाघ समोर दिसल्यावर म्हणे- ‘माझा मित्र माझ्याजवळ असता तर तुझे तुकडे केले असते.’ पण करतो काय? वेळ तर तुझ्यावरच आली आहे बाबा! तुझ्यात काय धमक आहे ती दाखव. असो! असे दुसऱ्यावर विसंबून राहणारे लोक फसतात, असा माझाच नव्हे तर जवळपास सर्वच सामान्य माणसांचा अनुभव आहे.’’
‘‘कित्येकांना वाटत असते की, आपल्या घराण्यात थोर पुरुष झाले तर ते आपला उद्धार करतील. मी म्हणतो, ‘ते तुमच्यात योग्यता नसतानाही तुमच्याकडून कार्य करवून घेतील तथापि तुमची अवस्था मात्र सामान्यत: तशीच राहणार आहे. रामाने वानरसेनेच्या हस्ते समुद्रात सेतू बांधण्यासाठी पाषाणांनासुद्धा तरंगण्यास भाग पाडले, परंतु कार्य आटोपताक्षणीच ते मूळ स्वभावावर गेले व आतापर्यंत ते बुडून बसलेले आहेत. मारुतीसारखे भक्तवीर स्वकर्तृत्वाने तरले आणि पाषाण मात्र स्वकर्तृत्वहीनतेमुळे जसेच्या तसे पडलेलेच आहेत. त्यांचा हा अभिमान फुकट नाही का, की ‘आम्हीच रामाला सीता मिळवून दिली. जर आम्ही पाण्यावर तरंगलोच नसतो तर राम येथून गेले तरी कसे असते?’ अहो दगडोबा! तुमच्या स्वत:च्या मताने का तुम्ही वर आले होतात? तसे असते तर तुम्ही पुन्हा पाताळात गेलातच का असतात?’’
‘‘अशीच स्थिती थोरांच्या सहवासात राहूनही स्वतंत्रपणे स्वत:त योग्यता विकसित न करणाऱ्यांची असते. त्यांचा सर्व थाटमाट त्या साधूवर किंवा त्या थोर पुरुषावरच अवलंबून असतो. जर त्या वीरपुरुषाचा मृत्यू झाला तर हे ते प्रभावशून्य होतात. अशावेळी अभिमानाने हाती धरून मिरविण्यास जर काही त्यांच्या जवळ राहात असेल, तर ती केवळ जुन्या वैभवाची आठवण! ते मोठय़ा डौलाने सांगत असतात की, ‘अहो! आम्ही काय कमी आहोत? आमचा सर्व काळ त्या बुवांच्या सहवासात गेला. आज आम्ही काहीच (विशेष) दिसत नसलो म्हणून काय झाले? त्यांच्यावेळी तर आमच्याच हाती सूत्रे होती!’ अहो, साधूंच्या नि पुढाऱ्यांच्या जवळील मिरासदारांनो, केवळ या गोष्टींनी जगात कीर्ती मिळेल असे जर का तुम्हास वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ती जर तुम्हास पाहिजे असेल तर स्वत:च अधिकारी होणे गरजेचे आहे. उगीच असला अभिमान अंगात आणणे म्हणजे बहुरूप्याप्रमाणे रंगाने रंगून स्वत:च्या कुवतीचा विसर पडणे नाही का?’’ महाराज ग्रामगीतेत लिहितात,
संताचा शुद्ध संकल्प।
त्यासि कळला, प्रगटला दीप।
धरोनी निश्चयाचा प्रताप।
उन्नत झाला सत्शिष्य।।