राजेश बोबडे
‘‘आपल्या अनुभवाने विश्वधर्माचे कोणते स्वरूप निश्चित केले आहे,’’ असा प्रश्न जापान येथे विश्वधर्म परिषदेत सहभागी वक्त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारला. त्याला उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘माझ्या मते समस्त विश्व नैसर्गिक नियमांनी बांधलेले आहे व त्यातील प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आणि मूल्य आहे. सर्व वस्तुमात्रांत श्रेष्ठ असलेल्या मानवाने सर्वाचाच योग्य आदर व उपयोग करून, निसर्गनियमांचे सर्वापेक्षा अधिक उत्तम पालन केले पाहिजे. पृथ्वीतलावर स्वत:ला ज्या तऱ्हेने जगावेसे वाटते तसे जीवन इतरांना जगू देण्याची काळजी घेणे हेच निसर्गत: मानवाच्या हिताचे आहे. जेव्हा सर्व मानव या नियमाचा आदर करतील तेव्हा सर्वाचेच जीवन सुखमय होईल, मग ते कोणत्याही देशधर्माचे असोत. विश्वाला एका कुटुंबात सुखसमाधानाच्या कक्षेतून गोवण्याला ही विचारधारा आचरणात आणणे आवश्यक आहे.’’
विश्वधर्म याहून वेगळा तो कोणता? हा विश्वधर्म स्थापन होणार तरी कधी? या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘मानव हा संसाराच्या विश्वविद्यालयातील विद्यार्थी आहे. तो चुकारपणा करेल, नुकसानीत येईल अन् त्यातूनच शिकत जाईल. जी व्यक्ती आलेल्या अनुभवांतूनही शिकणार नाही ती स्वत:ला फसवेल आणि त्याबरोबरच जगाचीही फसगत होऊन प्रगतीची आशा दुरावेल. नैसर्गिक नियमांना बाधा येऊन त्याचे पर्यवसान विश्वाची घडी विस्कटण्यात होईल, हे साहजिकच आहे. असेच होतही आले आहे. यासाठी मानवांची मने जागृत करणे आवश्यक आहे. देशादेशांतील मैत्रीचे संबंध व्यक्ती- व्यक्तींच्या मानसिक विकासानेच स्थापित होऊ शकतील!’’ मानसिक विकासाबाबत महाराज स्पष्ट करतात, ‘‘प्रत्येकाच्या मनाला हे पटले पाहिजे की, विश्वाच्या रंगभूमीवर आपण सर्व अभिनेते आहोत.
नाटकासाठी आपण भिन्न देशधर्माचे वेश चढवले असले तरी, मुळात आपण खरे मानवच आहोत. पूर्वीही आपण एकच होतो आणि नाटय़ाभिनयानंतरही एकत्रच येणार आहोत. मग या रंगभूमीवर मतमतांतरे वा धर्मपंथवर्णाचे वितंडवाद उपस्थित करून भांडण्यात अर्थ काय? या सर्व सोंगांच्या आतील सत्य आत्मतत्त्व काही भिन्न नाही. या एकात्मप्रत्ययाने आणि विश्वसुखाच्या भावनेने विश्वाचा प्रत्येक देश- प्रत्येक मनुष्य निसर्गनियमांनी वागू लागला तर, त्याच्या या विकासाला सुखशांतीची फळे आल्याशिवाय राहाणार नाहीत.’’
भारतात पंथ-धर्माचे असंख्य तुकडे आहेत. त्यांच्या गोंधळामुळे भारताच्या जीवनात अंदाधुंदी माजत नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘भारतात अनेक धर्मपंथांचे तुकडे आहेत यात शंका नाही. परंतु त्यामुळे भारताचे जीवन संकटात पडू शकत नाही. कारण, ते सर्व राष्ट्रोन्नतीच्या आड न येता राष्ट्रीय कार्यासाठी उच्च राष्ट्रीय भावनेने प्रसंगी एक होतात, ही भारताची विशेषता आहे! वाद्दय़ांच्या अनेक तारा एका स्वरात लागल्यावर गोंधळ होण्याचे कारणच काय?’’