राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेवेने मनुष्याच्या अंगी सामर्थ्य कसे येऊ शकते याचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उदाहराणासह विशद करतानाच सेवेच्या दुरुपयोगाबाबतही सावध केले. महाराज म्हणतात, एखादा दारुडय़ा जर गयावया करीत असेल आणि म्हणत असेल मला रोज दारू पिण्याची सवय आहे. आज मला ती मिळाली नाही, आपण कुठून तरी माझी व्यवस्था करा. मग अशा माणसाला दारू पाजणे किंवा ती विकत घेण्यासाठी पैसे देणे हे पुण्यकर्म व सेवाकर्म होऊ शकेल काय? कुमार्गाने जाणाऱ्यांना केलेली मदत सेवा होऊच शकत नाही. सेवा मानवाला सभ्य व उन्नत मार्गानीच नेऊ शकते. आज सेवेचा खरा अर्थ लक्षात न आल्यामुळे कितीतरी चांगली कामे वाईट होत चालली आहेत. 

ग्रामगीतेत महाराज याबाबत इशारा देताना म्हणतात :

तीर्थी दान सत्पात्रभोजन।

यज्ञादिकी खर्चावे अन्न,धन ।

त्यात सेवादृष्टीनेच सांगितले पुण्य।

येरव्ही मिथ्या।।

ज्यासि जरुरी त्यासी न द्यावे।

पवित्र स्थान म्हणोनि उधळावे ।

तरि तेणे पुण्य कधी न पावे ।

जनसेवेचे।।

अन्नदान अशाच कामापैकी एक होय. ज्या अन्नदानाने देश प्रगतीला पोहोचेल ते अन्नदान श्रेष्ठ होय. परंतु आज आपण काय पाहत आहोत? अमुक बुवाने एक निधी बनवून एक हजार साधुसंतांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु आज त्या ठिकाणी चोर, भामटेदेखील भगवे कपडे घालून वावरताना आढळल्याच्या  घटना घडल्या आहे. एक चांगली गोष्ट सुद्धा परिणामांचा विचार न करता चालू ठेवली तर किती वाईट होऊ शकते. याचा हा एक नमुना आहे. आज अनेक तीर्थस्थानेसुद्धा लुटमारीचे अड्डे बनल्याचे म्हटले जाते त्याला काही अपवाद असतीलही. धर्माच्या नावावर, विश्वशांतीच्या नावावर आज सारे जग संघर्षांला प्रवृत्त झाले आहे. धर्माचे नाव घेऊन लोकांच्या डोळय़ात धूळ फेकली जात आहे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की सेवेसारखी, धर्मासारखी चांगली बाबसुद्धा परिणामांचा विचार न करता उपयोगात आणली तर कुमार्गाला प्रवृत्त बनविते. हा धोका बाजूला सारणे हे गुरुदेव सेवामंडळाच्या सेवकांचे आद्य कर्तव्य आहे. भक्ती किंवा धर्माच्या नावावर लोक दिशाभूल करतात हे बंद झाले पाहिजे, असे महाराज म्हणतात.

rajesh772@gmail.Com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara gurudev seva mandal rashtrasant shri tukdoji maharaj explain about misuse of the service zws
Show comments