देशात अनेक संत महंत राजकारणात भूमिका घेत असताना, आपण राजकारणात का पडत नाही, असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रचारकाने विचारल्यावर आपली राजकारणाविषयी भूमिका विशद करताना महाराज म्हणतात, मला राजकारणापेक्षा धर्मकारण महत्त्वाचे वाटते. राजकारणात पडून सत्तेवर आरूढ झालेला माणूस जनतेकडून दंडुकेशाहीच्या जोरावर कामे करवून घेतो. धार्मिक भावनेने, सेवाभावाने व अत्यंत प्रेमपूर्वक जनतेला तिच्या कर्तव्याचे भान दिल्यानंतर तिला आपले कर्तव्य कळले की मग ती पुन्हा वाईट काम करीत नाही. पण बुद्धी व भावना जागृत न करता केवळ दंडय़ाचाच उपयोग केला तर समाजात मानवता निर्माण होण्याऐवजी पशुताच निर्माण होईल, ही गोष्ट मला अनुभवाने कळून आली आहे. वास्तविक राजसत्तेचा व धार्मिक सेवेचा हेतू भिन्न नाही. मानवांचे कल्याण हे दोहोंचेही उद्दिष्ट आहे. पण एकाचा मार्ग तमोगुणाचा तर दुसऱ्याचा सत्त्वगुणाचा आहे. माणसात खरीखुरी सत्त्वगुणी वृत्ती निर्माण झाली की त्याला कोर्ट, वकील व दलालाचे तोंड पाहाण्याची पाळीच येणार नाही. आणि जगाची घडी एकदा या शुद्ध भावनेवर बसली की हजारो वर्षे तरी या मनोवृत्तीचे पतन होणार नाही. आपले पूर्वीचे राजकारण आजच्या इतक्या गलिच्छ मनोवृत्तीने चालवले गेले असते तर भारतीय संस्कृती आजच्या काळापर्यंत टिकलीच नसती. पूर्वी धार्मिक भावनेने लोकांच्या हृदयाची पकड घेऊन त्यावर सद्विचारांची छाप पाडण्यात येत असे. हे संस्कार पिढय़ानपिढय़ा कायम राहात असत. पण आज रात्री एकाचे तर दिवसा दुसऱ्याचे अशी चंचल मनोवृत्ती निर्माण झाली आहे.

त्यामुळे मन राजकारणात पडायला धजत नाही. धार्मिकतेतसुद्धा राजकारणाइतकाच गलिच्छपणा शिरला आहे ही गोष्ट खरी आहे. धार्मिकतेच्या नावावर लोक वाटेल तसे पाप करून आपला स्वार्थ साधताना दिसतात. धर्माची खरी कल्पना विसरून तिला जातीयतेचे स्वरूप देतात. हे एक मोठे अज्ञान आहे. हे अज्ञान कायद्याने निघणार नाही. ते धार्मिकतेनेच निघेल. मी जी धार्मिकता म्हणतो ती नैतिक विचारसरणी व मानवतेच्या भावनेवर आधारलेली आहे. त्यात सर्व लोकांची सेवा करण्याचे ज्ञान व भान आहे. जगात ही धार्मिकता निर्माण झाल्याशिवाय कोणतेही राजकरण वा जाती चिरंजीवी होणार नाही. म्हणून मी धार्मिक सेवाच राजकारणापेक्षा महत्त्वाची समजतो. पण याचा अर्थ मला राजकारण किंवा सत्ता नकोच असा नाही. मला ती तोपर्यंतच हवी आहे जोपर्यंत लोकांना खऱ्या सेवेचे ज्ञान होणार नाही. याबरोबरच सर्व क्षेत्रात आज शिरलेल्या विकृतीवरही प्रकाश टाकताना महाराज आपल्या भजनात म्हणतात.

ये धर्म-गुंडे, राज-गुंडे, लोग-गुंडे बढ गये
घुसखोर गुंडे, चोर-गुंडे, साव गुंडे चढ गये
बेपार-गुंडे, प्यार गुंडे, बात गुंडे अड गये
सब जगह गुंडागर्दी से, ये राज ठंडे पड गये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेश बोबडे