– राजेश बोबडे
मैं गांधीजी का नहि शिष्य रहा,
ना गांधी मेरे किह भक्त रहे।
पर प्रेम था दोनों मे बडा,
वह मिट न सका, कोई लाख कहे।।
हम मानवता के पहले ही,
दोनो थे पुजारी अपने में।
जब भेट हुई प्रिय गांधी से,
वे भजन सुन अलमस्त हुए।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीय कार्याने व क्रांतिकारी भजनांमुळे प्रभावित होऊन महात्मा गांधींनी महाराजांना जुलै १९३६ मध्ये सेवाग्राम येथे महिनाभर सत्संगाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. पुढे दोघांचाही स्नेह वाढून दोघांमध्ये स्वातंत्र्यासाठी विचारांचे आदानप्रदान होत गेले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिमूरवरून नागपूरला येत होते, तिथेच ही बातमी महाराजांना समजली व महाराज तेव्हा नागपुरात राहत असलेले गांधीजींचे पुत्र रामदास गांधींसह दिल्लीला रवाना होण्यासाठी निघाले. सीपी अॅण्ड बेरार प्रांताचे राज्यपाल मंगलदास पक्वसा यांनी, गांधी हत्येमुळे प्रांतातील प्रक्षुब्ध झालेल्या जनसागराला शांत करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा बेत महाराजांना रद्द करायला लावला.
चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका
त्यांनी नागपुरातील पटवर्धन मैदानावर रात्री शोकमग्न जनसागरासमोर शोकसंवदेना व्यक्त केल्या. महाराज म्हणतात, ‘महात्माजींच्या निर्वाणानंतर आता पुढे काय? असा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो. कारण आजवर राष्ट्राचे भवितव्य त्यांच्यात केंद्रित झाले होते. महात्माजींच्या हत्येची वार्ता कळताच मला मनस्वी दु:ख झाले. पण लगेच हाही विचार मनात आला, की महात्माजींच्या जीवनाचा शेवट हाही आम्हा सर्वाना जबाबदाऱ्या उचलण्याचा एक आदेश आहे. महात्माजींच्या अपूर्ण आशा, आकांक्षा त्यांनी अंगीकारलेल्या कार्यात प्रतीत झाल्या आहेत, त्या पूर्ण केल्यानेच त्यांना शांती लाभेल. ते कर्तव्य करूनच त्यांचे वारसदार होण्यास आपण पात्र ठरू. या संकल्पासाठी सर्वानी एकत्र यावे, आता महात्माजी निर्वतले. प्रत्येकाच्या कसोटीची वेळ आली. जो प्रत्यक्ष काम करेल तोच आपला सहकारी.’
महाराजांनी गांधींची अनेक कार्ये पुढे नेली. महाराज म्हणतात, गांधीजींना सत्कर्म, सद्धर्म, सत्यानुभवाच्या समोर राजकीय स्वराज्याची फार किंमत नव्हती. जनता निव्र्यसनी, विधायक प्रवृत्तीची व आत्मनिष्ठ व्हावी, जुन्या परंपरांचा त्याग करून गीतेच्या शिकवणीप्रमाणे मानवाची प्रगती व्हावी, माणसाने विश्वसेवेसाठी शांतिदूत व्हावे यासाठी समाजाने सजग, समृद्ध आणि स्वतंत्र व्हावे हेच गांधीजींच्या स्वराज्याचे ध्येय होते. महाराजांनी गांधी गीतांजली ग्रंथातून गांधीजींच्या कार्याची ओळख करून दिली. गांधीजींचे मौन तोडण्याची विलक्षण ताकद राष्ट्रसंताच्या भजनात होती. याबाबत आपल्या भजनात महाराज म्हणतात,
एक दिन सुना गांधीजीने,
मेरा भजन अति प्रेम से।
वे कह गये ‘फिर से कहो’
रहते हुऐ भी मौन से।।
rajesh772@gmail.com