पंढरपूर येथे १९५१ मध्ये अखिल भारतीय संत संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केलेले विचार आजही प्रासंगिक आहेत. ‘बुवाशाही बंद करून ग्रामसेवक बना’ असा परखड इशारा देताना महाराज म्हणतात : देशाने संतांवर एक मोठी जबाबदारी परंपरेने सोपवून ठेवली आहे. ती म्हणजे, जनलोक नीतितत्त्वाने वागवावे, परस्परात बंधुभावना वाढविण्याचा प्रयत्न करावा व देवाच्या नावाची साधना धरून देशाचे भवितव्य उज्ज्वल करीत राहावे; हेच त्यांचे काम. मागील संतांच्या जीवनावरून हेच स्पष्ट दिसते. याकरिता त्यांनी भारताच्या चौफेर कानाकोपऱ्यात कुंभमेळे, तीर्थस्थाने, यात्रा, सप्ताह भरविण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यापासून काही काळपर्यंत संतांना तसा लाभही मिळाला असेल; पण आज मात्र ती साधने व त्यांचे जगणे देशाला उज्ज्वल करणारे दिसत नाही, हे धर्मवान पण मेलेल्या मनोवृत्तीचा नसेल असा कोणीही माणूस कबूल करू शकेल. त्यांची साधने सध्या माझ्यासारख्या काही मोजक्या माणसांना धष्टपुष्ट करणारी आहेत, त्याद्वारा मिळणारा पैसा त्यांच्या व्यक्तित्वाच्या बडेजावाकरिताच खर्च होत आहे, हे लपवून चालणार नाही. यज्ञांची, सप्ताहांची, पुराणांची, नवीन देव निघाला त्या निमित्ताने वर्गणी मागण्याची व त्यातून प्रचंड मठ उभारण्यासाठी मुबलक पैसा खर्ची टाकण्याची प्रथा अजूनही बंद झालेली नाही, मात्र त्याचा उपयोग आजच्या नवनिर्मितीच्या कार्याला होत नाही; हे संतपरंपरेला शोभत नाही. तेव्हा, एक तर या साधू संमेलनांना देशाच्या भवितव्य-दुरुस्तीचे स्वरूप तरी देता आले पाहिजे, नाहीपेक्षा ही संमेलने व विशेषत: साधूंच्या नावाची संमेलने तरी जनतेनेच बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.धर्म ही काही वेडगळ वस्तू नव्हे की जी राष्ट्रभक्तीपासून दूर सारून माणसाला निष्क्रिय करीत राहील. तेव्हा, यापुढे तरी उत्सव, यज्ञ, संमेलने यांना तात्त्विक स्वरूप आलेच पाहिजे. आमच्या भारतातील ‘साधू’ म्हणविणाऱ्या प्रत्येक साधकाने काही खेडी, गावे घेऊन ती आदर्श करून दाखविण्याची व तेथील जनतेत सहकारी वृत्तीने वागून त्यांच्यात राष्ट्र-धर्मभावना उज्ज्वल करावयाची जबाबदारी स्वत: घेतली पाहिजे. दुर्दैवाने आजच्या बुवालोकांच्या कार्याला मात्र पंथांच्या व व्यक्तिस्वार्थाच्या चढाओढीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा