राजेश बोबडे
सकाळच्या ध्यानानंतर सर्व बंधू-भगिनींनी शिस्तीत उभे राहून एकमेकांचे दर्शन घेण्याची व सद्भावनेने पाहण्याची प्रथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात सुरू केली होती. या प्रथेबद्दल एका चिकित्सकाने महाराजांकडे प्रश्न उपस्थित केला. प्रश्नकर्त्यांला उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘तुकडय़ादास हा फक्त दहा-पाच भाविकांच्या पाया लागण्यावर अथवा चंदन-कुंकू लावण्यावर मुळीच संतुष्ट नाही. त्याला भारताच्या भाविकांची व्यक्तिपूजा सामाजिक रूपात आणवयाची आहे व पुजेला उच्चस्थानावर न्यायचे आहे. तो तुमच्यापुरता राहू नये व तुम्ही फक्त त्याच्यापुरते राहू नये, अशी त्याची मनीषा आहे. व्यक्तिपूजेचे स्तोम माजविण्याचे पाप या देशात मर्यादेपेक्षा अधिक घडले आहे.’’
‘‘साधुसंतांना जातीच्या विचारांनी बांधून ठेवले आहे व वाढवलेल्या संप्रदायाला धर्म म्हणूवन घेण्याच्या धोरणाने जोर धरला आहे. वाईट प्रवृत्तींना चांगुलपणा येणे हा माणसाने समाजदेवाला ओळखण्याचा प्रारंभ आहे. ज्यात भावभक्तीही नष्ट होत नाही आणि सर्व काही साधून जाते. पाया पडले, तुकडय़ाला जेवण दिले की मग आपल्यावर दुसरी कोणतीही जबाबदारी नाही हे जे कुणा पंडिताने, भोळसर साधूने वा द्रष्टय़ा नसलेल्या गुरूने सांगितले आहे त्याला नवी दृष्टी द्यावयाची आहे की बाबा रे, देवाची वा संतांची पूजा सेवेसाठी, श्रम करण्यासाठी आहे. आपले दुर्गुण सोडण्यासाठी आहे. गोरगरिबांना उद्योगी करून कामाला लावण्यासाठी आहे. हे तू काहीही करणार नसलास तर तुझे घेतलेले दर्शन व तुझी केलेली पूजा तुझ्या गुरूला, देवाला आणि देशालाही धूळीत मिळवेल. एवढे पाप कसे टाळता येईल याचा हा प्रेमळ प्रयत्न आहे.’’
‘‘संतांच्या पाया पडून वंदन करण्यापेक्षा त्यांना एकदा समष्टी भावनेने वंदन करून त्यांनी दिलेली आज्ञा पाळण्यातच खरी पूजा आहे. पर्वत उचलून फेकता येण्याची शक्ती हनुमंताजवळ होती, पण त्याने तिच्याद्वारे प्रभूची सेवा केली. तशीच जटायूने रामाची पूजा केली. त्याने श्रीरामाचे काम समजून पूजा समजून रावणाशी लढाई केली आणि पंखात बळ असेपर्यंत लढत राहिला. बिभीषणानेही तशीच पूजा केली. आपल्याला जर काही स्वामीच्या, संतांच्या समाजाच्या उपयोगी पडायचे असेल, तर आपणालाही कार्यपूजाच समजली उमजली पाहिजे. किती दिवस साधूंच्या व दगडांच्या पाया पडून पडून जन्म घालवणार? तेच तेच शिकून १२ वर्षे नापास होणाऱ्याला आपण नालायकच समजतो ना? मग आपणही तर तेच करतो! तेव्हा आपला उद्धार कसा होणार हा विचार माझ्या डोक्यात सारखा खेळत राहतो, म्हणून हा प्रकार मी लोकांची शक्ती एवढय़ाच कामी लागू नये म्हणून चालवितो आहे. महाराज आपल्या लहर की बरखेत म्हणतात-
होता प्रभाव न व्यक्तित्व का,
पडे बल की चारीत्र्य का ।
विद्वान पूजा जायगा,
कोई भी देश-विदेश का।।
जिसकी तपस्या मानवों की,
पूर्ण सेवा में लगे।
उसके लिये भगवान भी,
मंदिर में रहते जगे।।