राजेश बोबडे
उपासकांच्या मनोवृत्तीच्या दोन प्रवाहांचे निरूपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. महाराज उपासना मार्गाबद्दल सांगतात, ‘तुम्हाला जर प्रथम मार्गाचे भक्त व्हायचे असेल तर सावध राहा. तो देवाच्या भक्तीचा मार्ग नसून आपली व्यसनपूर्ती करण्याकरिता देवाच्या नावाचा आधार घेऊन आपला पापाचरणाचा मार्ग मोकळा करण्याचा एक प्रकार आहे. कदाचित कित्येक अज्ञानी लोक सद्भावनेनेही असे करीत असतील पण मग ते कळूनही माघार घेत नाहीत. अशा भक्ताला आणि त्याला मदत करणाऱ्या (त्याच्या सोयीच्या समजुतीप्रमाणे ठरलेल्या) देवाला चुकून फुटक्या कवडीची फुले वाहण्यास तयार होणार नाही. जो भक्त (?) असे समजेल की, देवाच्या कृपेने मला ही पापवृत्ती व पापसाधना प्राप्ती झाली, त्यासमोर व त्याच्या त्या देवासमोर मी कधीही डोके नमवावयास तयार नाही. मला असल्या देवभक्ताची मुळीच गरज नाही,’ अशा परखड शब्दांत महाराज उपासना पद्धत समजावून सांगतात.
वास्तविक हे देवाचे कृत्य नसून व्यसनाधीन लोकांच्या मनाचाच हा सारा खेळ आहे, आणि फुकट पोट भरणाऱ्या बुवाचेच (मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असो) हे तत्त्वज्ञान असून यात उन्नतीस कोठेही वाव नाही. मला हेच सांगावयाचे आहे की, जर तुम्ही देवाचे उपासक होऊ इच्छित असाल तर तुमच्यात सद्गुणांचा विकास होऊ द्या. शील, सद्बुद्धी, अन्यायाचा प्रतिकार करण्याची धमक, इतरांच्या सेवेस तत्पर असण्याची वृत्ती, मनुष्यमात्राशी समतेची वागणूक, सदैव अनासक्तता आणि कार्यतत्पर वृत्तीची अखंड धारणा इत्यादी गुण अंगी बाणतील तरच तुम्ही देवास प्रिय होऊ शकाल. याकरिता सज्जनांना आपल्या भक्तीची आराध्यदेवता ठरवणेच भाग पडेल. ती ठरवताना मला वाटते की, तुमच्यात अन्य देवभावना राहूच शकणार नाही. ज्याप्रमाणे खरे मित्रत्व कळले की, बेगडी मित्रता भुलवू शकत नाही, त्याप्रमाणेच सत्य देवाच्या निर्भेळ भक्तीची धारणा कळली की, देवांना धुंडाळण्याचे कारणच उरत नाही व ‘मतामतांची गाथागोवीही’ गुंतवू शकत नाही.
‘खरे प्रेम निर्माण झाले म्हणजे देवाला शोधण्याचे प्रयासच उरत नाहीत. कारण ती एकच एक शक्ती सर्वात व्यापलेली असून सर्व जग न्यायाने चालवून व समतोलपणा कायम राखून सर्वाना आपल्या उदार समतेच्या तत्त्वात विलीन करते. त्या प्रभूच्या प्राप्तीच्या उद्देशाने केलेली भक्तीच अमर, अविनाशी अशी खरी भक्ती होय व तीच सहजगत्या त्या प्रभूची ओळख करून देते, परंतु अशा ईश्वरप्रेमाने प्रेरित होऊन उपासना करणारे अगदी क्वचितच दृष्टीस पडतात. जिकडे पहावे तिकडे ‘लोभी गुरू व लालची चेले’ उपासनेच्या नावावर आपला क्षुद्र स्वार्थ साधण्याची खटपट करीत असलेलेच दिसून येतात आणि त्यांच्या त्या ‘‘सव्यापसव्यचेष्टांनी’’ भक्तिमार्गाचे केवळ विडंबन होते. भक्तीच्या नावावर चालणारी ती नीच व मूर्खत्वाची सोंगे पाहिली की कोणासही किळस व संताप आल्याखेरीज राहणार नाही,’ असे महाराज म्हणतात.