राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आज बुवांनी वैयक्तिक देवपूजेबरोबरच विश्वधर्माचे पूजन केले पाहिजे. ‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले।। साधु तोचि ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’ हे वचन अगदी सत्य आहे. आज रंजल्या, गांजल्याची सेवा करण्याकरिता संप्रदाय, पंथ व संस्था याविषयींचा दुरभिमान टाकून एकाच अधिष्ठानाखाली यायला हवे. पूर्वीच्या काळी विभन्न पंथ व संप्रदाय होते पण त्यांचे कार्य एकमेकांस पोषक असेच होते. शरीराचे अवयव भिन्न असले तरी ते एकोप्याने कार्य करतात व शरीराचे पोषण होते, तद्वतच विविध संस्थांनी समाजाचे पोषण केले पाहिजे.’’
‘‘हा जातीयतेला मूठमाती देण्याचा काळ आहे. राष्ट्रक्रांती व धर्मक्रांतीच हा काळ नाही तर निसर्गातही क्रांती घडण्याचा काळ आहे. अशा वेळी आम्ही सर्वत्र पावित्र्याचे, त्यागाचे, चारित्र्याचे, कलाकुशलतेचे व सामुदायिक भावनेचे वातावरण निर्माण केले पाहिजे. त्याकरिता क्वचित संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही. संघर्षांशिवाय नवीन राष्ट्र निर्माण होणार नाही. घातक रूढींना मूठमाती द्यावी लागेल. स्वार्थाला आळा घालावा लागेल.’’
तीर्थक्षेत्राला कार्यक्षम करण्याची गरज अधोरेखित करताना महाराज म्हणतात, ‘‘धर्म कोणताही असो, आज बहुतांश तीर्थक्षेत्रे भ्रष्ट झाली आहेत. पूर्वी ती धर्म, ज्ञान-प्रसाराची स्थाने होती. आज ती व्यापारी पेठा, बुवांचे राजवाडे व देवांची बंदिस्थाने होऊन बसली आहेत. ती पुनश्च ज्ञानदानाची पवित्र विद्यालये व सदाचारांचे पाठ घेण्याची स्थाने बनली पाहिजेत. पूर्वी गुरुकुले होती. त्यातून जे विद्यार्थी तयार होत ते संसार करून परमार्थ साधत. वैयक्तिक हितसाधन समाजहिताचीच एक भाग मानत. त्यामुळे समाजात व राष्ट्रात नैतिकतेबरोबरच वैभवही झळकत होते. आज राजकारणाची धर्मकारणाशी फारकत होऊ पाहात आहे. वास्तविक दोहोंची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. धर्मगुरूंनी राष्ट्राच्या उन्नतीच्या आड येऊ नये व राजनीतीज्ञांनी धर्माची उपेक्षा करू नये.’’
‘‘आज राष्ट्रवीरांबरोबरच धर्मवीरांचीही गरज आहे. राष्ट्राची ज्या ज्या वेळी सर्वागीण उन्नती झाली त्या त्या वेळी राष्ट्रपुरुष व संतमहात्म्यांनी एकोप्याने कार्य केल्याचे आढळेल. धर्म राष्ट्राच्या आड येत असेल तर तो सद्धर्म नव्हे. सद्धर्म हा राष्ट्रीयतेचा पाया होय. त्यावरच राष्ट्रीयतेचे मंदिर उभारले पाहिजे. तरच ते चिरकालिक ठरेल. आज देवभक्ती आणि देशभक्ती हातात हात घालून चालताना दिसली पाहिजे. आपल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगावा पण अन्य धर्माचा द्वेष करू नये. सर्वधर्म परमेश्वराप्रत जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. सागराला मिठी मारणाऱ्या त्या सरिता आहेत. सतत वाहणे हाच त्यांचा धर्म असल्यामुळे त्या नेहमी शुद्ध होत असतात.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात..
पुन्हा सुधारावी मंदिर-योजना।
सुरू करावे लोकशिक्षणा
गांभीर्य आणावे तया स्थाना।
सद्विचार वाढवया।
राजेश बोबडे