राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘शुद्ध आचार हाच खरा धर्म! नीतिचारित्र्य हीच खरी पूजा’’ त्यादृष्टीने सत्कार्याचे नियम आज लोकांना लावले पाहिजेत. ज्यांचा ज्यांच्याशी संबंध येईल त्यांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी म्हटले पाहिजे की, स्वतंत्रपणे राहा, मन प्रसन्न ठेवा, वर्तणूक चांगली ठेवा, सेवा करा. आड येईल त्याला येऊ द्या; त्यातून विचाराने मार्ग काढा,’’ असा विश्वशुद्धीचा मूलमंत्र देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जीवनाचा उद्धार पुस्तके वाचून किंवा भजन करून होत नसतो. नुसत्या कामानेही पूर्णता होत नाही. आचारविचारांची शुद्धी त्यासाठी जरुरीची ठरते. प्रार्थना ही नुसती कसरत आहे. आम्ही स्वत:च स्वत:ला उत्तम ठेवू, काम करू, प्रेमाने समजावू इत्यादी संकल्प दृढ करण्याचा तो प्रयोग आहे. ती संकल्पशक्ती प्रत्यक्ष जीवनात आपण आणू तरच सेवकांचा विकास होईल! प्रभाव आहे तो आचारशीलतेत!’’

‘‘माणूस अंगठाछाप असला, तरी इमानदार पाहिजे. कामचुकारपणाने देशाचा नाश होईल. आळशीपणाने झोपा काढणाऱ्याला आपल्या देशात भाग्यवान व सुशिक्षित मानले जाते. जगाच्या गुरूस्थानी असलेल्या भारतात ही प्रवृत्ती बळावली तर ते किती वाईट आहे! वास्तविक आपण वेळच्यावेळी काम केले पाहिजे. कोरडे विचार करत कामात घोटाळे करणे चुकीचे आहे. कामात तन्मयता व चपळता साधली पाहिजे. परदेशातील लोक हजारो एकर जमिनीचे मालक असले तरी मजुराप्रमाणे लहानमोठी कामे करण्यात भूषण मानतात; म्हणूनच त्यांचे देश प्रगत झाले आहेत. आज आपल्याला स्वत:बरोबरच समाजाकडून काम करून घ्यावयाचे आहे. त्यासाठी हृदय विशाल असले पाहिजे. ‘‘विकार असलेल्या हृदयातून कितीही उपदेशाचा आवाज बाहेर पडला तरी काही उपयोग नाही.’’

‘‘श्रीगुरुदेव सेवामंडळ एक नमुनेदार बगीचा आहे. जेथे जे उत्तम दिसेल ते तेथून आणून याला सुंदर व समृद्ध केले जात आहे. शोधक लोक पुढे म्हणतील, की अमुक गोष्ट यात इस्लामधर्मातून घेतली आहे, अमुक गोष्ट ख्रिस्ती धर्मातील आहे. कुठूनही काही आणलेले असो, आहे ते जीवनोपयोगी! यासाठी सर्वजण यात सामील व्हा, सर्व प्रेमाने एकत्र राहा, सद्भावना वाढू द्या; मात्र व्यवस्था बिघडू देऊ नका. चुकणाऱ्या माणसावर केवळ चुकीची जबाबदारी सोपवूनच भागणार नाही; त्याला मार्गास लावा. रस्ता सोडून चालणाऱ्या मुलाला तेथेच टोका. भिकारीही आपलाच आहे, पण त्याला उद्योगाला लावा. भलत्याच ठिकाणी दया दाखवाल, तर त्यामुळे विकृती वाढत जाईल. प्रेमाच्या या मार्गानेच सफलता मिळेल. सहयोग निरंतर राहिला पाहिजे. सर्व माझे आहेत. गाव माझे घर आहे- सर्व माझे भाऊ आहेत ही भावना वाढली पाहिजे, हेच सुराज्याचे मुख्य सूत्र आहे.’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara pure conduct is the true religion tukdoji maharaj ysh