राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने’ असा उल्लेख आपल्या राष्ट्रवंदनेत करून एक दिवस चीन भारतावर युद्ध लादेल, असे भाकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले होते. १९६२च्या भारत-चीन  युद्धाच्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चीनच्या युद्धपिपासू वृत्तीचा निषेध केला. भारत चीनच्या नेफा, तिबेट, सियालकुटी, सिलिगुडी, गुहाटी युद्धसीमेवर जाऊन भजन व भाषणांनी सैनिकांचे मनोबल वाढविले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ‘भारत सेना सेवा निधी’ स्थापन करून संरक्षण निधीमध्ये भरघोस मदत केली.

महाराजांनी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर विचार मांडले. यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले ‘‘महाराज शांतीचा जप केल्याने आज विदेशातून शस्त्र मागविण्याची वेळ आली आहे.’’ महाराज म्हणाले ‘‘युद्धविरामाची घोषणा करूनही चीनने तिबेटमध्ये युद्धाची तयारी  केल्याने चीनची दगाबाजी समोर आली. युद्धविरामाच्या घोषणेने हुरळून न जाता संरक्षणाचा आग्रह सर्वत्र कायम ठेवला पाहिजे. संरक्षणाच्या बाबतीत इतरांवर विसंबून राहाणे योग्य नाही. शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच होण्यासाठी कारखाने काढले पाहिजेत.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : पुरुषी अहंकारामुळे महिलांची गळचेपी?

सिलीगुडी, गुहाटी व नेफा सीमेवर, लष्करी तळावर भारतीय जवानांचे धैर्य वाढवताना महाराज म्हणतात, ‘‘चीनच्या अमानुष आक्रमणामुळे आमच्या देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आलेले आहे. चीनने साम्राज्यवादी नीतीचे राक्षसी मुख उघडले आहे. चीनची ही युद्धतयारी आजची नाही. ‘मेरे प्यारे सुंदर भारत को दुष्मन की नजर ना लगे’ असा इशारा मी भजनातून देऊन ठेवला होता. हिंदी-चिनी भाई-भाई  म्हणून चीनने भारताचा विश्वासघात करून पंचशील तत्त्वाचा अवमान केला. आज देशातील प्रत्येक नागरिकाने देशाचा सैनिक होण्याची वेळ आली आहे. चीनची ही आपत्ती एक इष्टापत्तीच म्हटली पाहिजे’’ हे महाराजांचे उद्गार यथार्थ होते. या आक्रमणाबरोबरच देश स्वतंत्र झाल्यापासून सुस्त असलेली भारतीय जनता खडबडून जागी होत गेली. तिच्यात एकात्मतेची भावना निर्माण झाली. देश की जनता के नाम संदेश, घोषणा, आवाहन या शीर्षकांची हृदयस्पर्शी पत्रके प्रसिद्ध करून सिलीगुडी येथे महाराजांचे साथी सर्वश्री जनार्दन बोथे, मिच्छद्रनाथ चव्हाण, बाबाराव ठाकरे यांनी वितरित केली.

युवकांनी मोठय़ा संख्येने लष्कारात जावे यासाठी भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ठिकठिकाणी  युवकांचे मेळावे, सीमा भागांतील जनतेत जनजागृती व लढाऊ बाण्याला उत्तेजन देण्याचे कार्य महाराजांनी केले. यावेळी सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणसुद्धा त्यांच्या सोबत होते. ‘‘स्वातंत्र्य टिकविण्यासाठी बलशाली होणे आवश्यक आहे, शांतीचा आवाज टिकविण्यासाठी शक्तीची जोड आवश्यक असते. आमचा इतिहास शूरांचा आहे. गीतेत कृष्णाने अर्जुनाला मैदानात उतरून युद्ध कर हाच संदेश दिला आहे,’’ असे सांगून महाराज भजनात म्हणतात-

तैय्यार हुआ है हिन्द तुम्हारे साथ।

आओ चिनीयों!

मैदान में देखो हिन्द का हाथ॥

तुकडय़ादास कहे,

इस रण में- विजय हमारे साथ!

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara rashtrasant tukadoji maharaj collected fund for army during india china war zws
Show comments