राजेश बोबडे
‘समाजाच्या जीवनात हवी ती क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य साहित्यिकांत आहे. त्यांनी ठरवले तर वाणी किंवा लेखणीने एखाद्याचा विनाशही करू शकतात आणि अमृतसंजीवनीप्रमाणे स्मशानातसुद्धा नंदनवन निर्माण करू शकतात, एवढे प्रचंड सामर्थ्य साहित्यिकांत आहे,’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे साहित्यिक व विद्वज्जनांशी हितगुज करताना म्हणतात. ‘एके काळी साहित्यिकांनी गोठय़ातसुद्धा देवाची स्थापना केली आणि सर्व समाजाला भजनी लावले; परंतु आज आपणास गोटे बनलेल्या मानवात देवत्व जागवायचे आहे. गाद्यागिरद्यांवर लोळून करुणरसाची कवने आळवणाऱ्यांना ही गोष्ट पटवून द्यावयाची आहे की, दु:खितांचा आर्त टाहो ऐकून धावून जाणारा व आपल्या सेवेने त्यांच्या दु:खाश्रूंच्या जागी आनंदाश्रू निर्माण करणारा सहृदय सेवक हाच खराखुरा साहित्यिक आहे,’ असे महाराज सांगतात.
‘हजारो माणासांनी श्रम करून उपाशी मरावे, त्यांच्या श्रमावर मूठभर लोकांनी भरमसाट नफा मिळवावा आणि त्या नफेखोरांपासून वाटा मिळतो म्हणून ठरावीक लोकांनी कष्ट करणाऱ्या लोकांची ही गळचेपी अबाधित ठेवावी आणि त्यांची तरफदारी करीत जावी ही गोष्ट सहृदयतेला किंवा मानवतेला धरून नाही. कष्ट करणाऱ्यांना हक्कांची व ऐतखाऊंना कर्तव्याची जाणीव करून देणे हे साहित्यिकांचे मुख्य कर्तव्य आहे. स्वत: कष्ट करणाऱ्या लोकांची आम्ही किती गळचेपी करत आहोत, याची जाणीव ऐतखाऊ लोकांच्या हृदयात निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य साहित्यिकांनी केले पाहिजे.’
‘मोजके पुढारी किंवा मूठभर सुशिक्षित, मूठभर श्रीमंत लोक म्हणजेच संपूर्ण भारतवर्ष नव्हे. भारतातील बहुजन समाजातील सुधारणा म्हणजेच भारताची खरी सुधारणा समजली जाईल. देशातील लाखो नागरिकांना राहायला साधी झोपडीही मिळत नसताना, कवीकल्पना करून नुसते ताजमहालाकडे बोट दाखवून त्यावर काव्य लिहिण्याने भारत संपन्न ठरेल असे नाही. त्यासाठी बहुसंख्य जनतेचे जीवनमान वरच्या पातळीवर आणण्यासाठी, त्यांच्या उद्योगादिकांना लोकांतून प्रोत्साहन मिळायला हवे. ग्रामीण जनतेतील या वस्तू, हे रिवाज, ही साधने उत्तम खुलून उठतील अशा प्रकारे त्यांची महती आपल्या कुशल कुंचल्याने रंगविणे, हे कार्य जेवढे साहित्यकार, कवी, पत्रकार व विद्वान वक्ते करू शकतील तेवढे आजच्या जगात अन्य कोणीही करू शकणार नाही.’ आजच्या समाजव्यवस्थेवर महाराजांनी ग्रामगीतेत अचूक भाष्य केले आहे. ते म्हणतात,
अरे! उठा उठा श्रीमंतांनो।
अधिकाऱ्यांनो पंडितांनो।
सुशिक्षितांनो साधुजनांनो।
हाक आली क्रांतीची।।
गावा-गावास जागवा।
भेदभाव हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा।
rajesh772@gmail.com