राजेश बोबडे
‘‘आचाराविण धर्म कशाचा? अवडंबर सगळे’’ असे भजन म्हणून आपल्या कथनी व करनीत फरक पडू देऊ नये असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘आपल्या देशात पंथवाद्यांनी मानवतेचा बीजांकुर भस्मसात केला आहे. जातीयतेच्या गैरसमजामुळे तर बराच घात झाला आहे. धर्माच्या अंधश्रद्धेमुळे माणसा-माणसांतील झगडे पूर्वीपासूनच चालू आहेत व आताही प्रांतीयतेचा कर्कश स्वर आपल्या भेसूर स्वरूपामुळे देशातील वातावरणात भयानकता निर्माण करू लागला आहे. सांप्रत मार्गाच्या जाती मिटत चालल्या आहेत. कदाचित पंथसंप्रदायाकडे दुर्लक्षही झाले असेल; पण हा नवीन कर्णकटू स्वर आपले विचित्र रूप धारण करून पुन: नव्या रूपाने तेच जातीयतामूलक प्रतिगामित्व देश-जीवनात निर्माण करू पाहत आहे. अशा विचारांना जर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर देशाची प्रगती सहजच खुंटेल; यात शंका नाही. भाषण उदात्त देता येत असले म्हणून काय झाले? जर भाषणातील विचार प्रत्यक्ष कृतीत कार्यान्वित होत नसतील तर ते भाषण कुचकामी ठरेल. सक्रियता हाच भाषणाचा आत्मा होय व हे लक्षात घेऊनच श्रीगुरुदेव सेवामंडळाची संघटना म्हणजेच मानव-सेवकांची संघटना आज हवी आहे.’’
महाराज म्हणतात, ‘‘माझ्या मनाला सतत वाटत असते, की प्रत्येक गावात या विशाल भावनेने वागणारे क्रियाशील सेवक निदान पाच तरी असावेत व त्यांनी ही विकृत समाज-व्यवस्था पुन:पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने या देशात सुख-समृद्धी व एकत्व नांदू शकेल. प्रत्येकाने आपला देश, आपला धर्म, आपले सदाचार, सातत्याने टिकवावे व मानवतेची दृष्टी सर्वाना लाभावी. प्रथमत: एवढे जरी झाले तरी देश शांत राहू शकेल. आता बोलण्याने कार्यभार साधेल ही दुराशा सोडून द्या. संतांच्या म्हणण्यातली, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,’ ही शिकवण लक्षात घ्या. महाराज स्पष्ट करतात की, मी पंथांचा, जातींचा, धर्माचा वा प्रांतांचा विरोधक आहे- असा समज कोणी करून घेऊ नये. देशप्रेम, मानवप्रेम उत्तरोत्तर विशालत्वाने आमच्या हृदयात चमकत राहो, हेच मला सांगावयाचे आहे.’’
‘‘एका घरात वावरणारी माणसे अनेक उद्योगधंदे करतात; परंतु आपले घर एक आहे, हे ते विसरत नाहीत. तसेच आम्ही आपापल्या साधनांनी व आपापल्या उपासनेने व व्यवस्थेने या राष्ट्रगृहात सौंदर्य निर्माण करूनही मानवतेला दृढनिश्चयाने चिकटून राहू शकतो व यासाठी फक्त बोलणे कामी पडत नाही; तर याला सक्रियतेची जोड हवी. कारण उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते. महाराज ग्रामगीतेत लिहितात,
ज्याने सत्याशी नाते जोडले। त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले।
सांगण्याहूनिही सामर्थ्य चाले। त्याच्या शुद्ध जिवनाचे।।