प्रचारकांना उद्देशून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : दिशाभूल करणारा उपदेश जनतेला देणाऱ्यांप्रमाणेच असाही एक प्रचारक वर्ग या आढळतो, जो नि:स्पृह प्रामाणिकतेने आणि कळकळीने मार्गदर्शन करीत राहतो; परंतु त्यातही राष्ट्राचे अनहितच साठवले असते. कारण, त्यांचे विचार प्रामाणिक असले तरी प्रसंगाला धरून नसतात. कर्मठ वृत्तीमुळे नकळत राष्ट्राचे पाऊल मागे ओढण्याचे कार्यच त्यांच्याकडून होते. स्वामी रामतीर्थानी म्हटले आहे की, ‘‘चेले अतवार ऋषियों मुनियोंके, ऋषि तुमको नही बना सकते। वक्त और था औरही दिन थे’’ अर्थात् ऋषिमुनींचे ग्रंथ तुम्हाला ऋषी बनविणार नाहीत; तो काळ निराळा होता. त्यांच्या विचारातून, आजच्या काळाने उत्पन्न केलेल्या नव्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वबुद्धीने व ध्येयनिष्ठ दृष्टीने शोधता आली पाहिजेत. परंतु ही सावधगिरी बहुधा प्रचारकात राहात नाही, त्यामुळे घोटाळे होत जातात. वास्तविक प्रचारक हा प्रसंगोचित रीतीने आपल्या सर्व गोष्टीत, ध्येयाला धक्का न लागू देता, बदल करू शकला पाहिजे. त्याला हे कळले पाहिजे की, आज देशाच्या सामर्थ्यांस कोठून ओहोटी लागली आहे व काय कमी झाले आहे. मूळ कारणे लक्षात घेऊन त्याने लोकसंग्रह व लोकसंघटना करून विविध उपायांनी देशाची कमान सरळ केली पाहिजे.
जेवढे पंथ तुम्ही पाहात आहात, त्यांच्या पूर्वीचा धडा असाच होता; पण त्यांना आज विस्मृती झाली आहे. वास्तविक त्यांना हे कळायला हवे की कोणतीही सेवा मर्यादित काळाकरिताच असते. तत्त्व अमर असले तरी ते व्यवहारात खेळविण्याची पद्धती ही बदलणारी असते. मोठमोठी झाडे पुरात वाहून जातात व लव्हाळी मात्र राहतात. वाहते पाणीच निर्मळ व सकस राहू शकते आणि त्यातच नदीचे सनातन जीवन कायम असते. हे न जाणल्यानेच ‘लकीरके फकीर’ किंवा ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ असे लोक नव्या योजनेत कामी पडत नसतात. तत्त्व नाही तर धोरण व कार्यप्रणाली तरी देशकालपरिस्थिती ध्यानात घेऊन बदललीच पाहिजे, याची जाणीव प्रचारकांना असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीचे मी श्रीगुरुदेव सेवामंडळाचा नंदादीप मंडळाच्या विरक्त प्रचारकांच्या हाती देत आहे. तो कुणाच्याही व्यक्तिमाहात्म्याच्या भरवशावर, नोकरीपेशावर वा काही आशेवर जळत ठेवावयाचा नसून तो नि:स्पृह वृत्तीच्या व फकिरी वेशाच्या आधारावर तसेच मित्रत्वाच्या सामर्थ्यांवर तेवत ठेवावयाचा आहे. त्यासाठी यथार्थ बोध, तारतम्यदृष्टी व सेवाबुद्धी हेच तेल असावयास पाहिजे आणि तेवढय़ावरच तो सदा तेजस्वी दिसणार आहे. कोणत्याही पंथ व संप्रदायातील, जाती व संस्थेतील प्रचारक वा उपदेशक तुम्ही असा, तुम्हा सर्वाना हा दीप हाती घेऊन निष्काम वृत्तीने व कळकळीने समाजात समयोचित प्रकाश पसरविण्याचा अधिकार आहे. पण हे लक्षात असू द्या की, जेव्हा प्रचारकाला विशिष्ट गावाचा किंवा प्रांताचा, आश्रमाचा किंवा जातिपंथाचा, सन्मानाचा किंवा उदार देणगीदारांचा मोह सुटतो, तेव्हा तो पदाचा राजीनामा देण्याच्या लायकीचाच झालेला असतो. प्रचारकांनी व त्यांना थोर मानणाऱ्यांनीही ही गोष्ट विसरू नये.
राजेश बोबडे