‘‘सत्ता की आयु न बडमी, सेवा की ध्वज सदा खडमी’’ असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जाणते लोक मागासलेल्या जनतेची सेवा व उन्नती करण्याऐवजी फुकटची मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठीच धडपड व ओढाताण करू लागले, तर त्यांचे ते महापाप राष्ट्राला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. मस्तवाल हत्ती आपसात खूप झुंजतात, पण त्यामुळे झाडाझुडपांचा नि गरीब जीवांचा चुराडा होतो; याला जबाबदार कोण? वास्तविक दोघांनीही एक व्हावे- स्वार्थासाठी नव्हे तर सेवेसाठी- यातच सर्वाचे कल्याण आहे.’’
‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत का? राष्ट्रोन्नतीच्या शेकडो गोष्टी आपणा सर्वाची वाट पाहात आहेत. मग आपसात अशी चढाओढ करण्यात शहाणपण कसले? तुम्हाला समाजाचे खरे नेतृत्वच हवे असेल, तर त्यासाठी सत्तेची लालसा सोडून सेवेचाच मार्ग चोखाळणे उत्तम. सत्ता आणि सेवा यांचे सत्याच्या अधिष्ठानावर ऐक्य घडवून आणण्यातच आज सर्वाचे हित आहे. सामान्य जनांचे प्रामाणिक सेवक होऊन त्यांच्या हृदयसिंहासनावर गौरवाने विराजमान व्हावे!’’
‘‘आज घराघरांत गटतट पडले आहेत; एकेका संस्थेत अनेक गटतट आहेत. प्रत्येक पुढारी राजासारखा डामडौलाने नांदू पाहात आहे. अनेक जण जनतेची तोंडदेखली कळकळ दाखवितात, मात्र निरपराध जनतेला जे कष्ट सोसावे लागत आहेत, त्यांच्या निवारणासाठी कोणीही पुढे पाऊल टाकण्यास तयार नसते. जो तो पुढारी बनून सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कृष्णकारस्थाने, इलेक्शनबाजी, मारामाऱ्या करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. वास्तविक हा मार्ग अत्यंत धोक्याचा असून, राष्ट्रात अशीच यादवी वाढत गेल्यास त्याचा परिणाम सर्वाच्या शक्तियुक्तीचा व जीवनसुखाचा परस्परांकडून नाश होण्यातच होणार, हे उघड आहे.’’
‘‘एकेक तालुका, जिल्हा किंवा गाव घेऊन, त्यालाच आपले कार्यक्षेत्र बनवून, तेथे रामराज्याची कल्पना आपल्या विधायक कार्यक्रमांनी प्रत्यक्षात आणून दाखवा; म्हणजे काही ओढाताण न करताही तुम्ही सहजच जनतेचे खरेखुरे पुढारी व्हाल. बनवाबनवी न करताही लोक तुम्हाला आपले नेते ठरवून सन्मान देतील. तुमचे सेवेने प्राप्त झालेले पुढारीपण हिरावून घेण्याची ताकद सत्तेच्या अंगीदेखील राहणार नाही. झगडा सत्तेचा असतो, सेवेचा असूच शकत नाही. सत्तेसाठी तुम्ही कितीही धडपडलात तरी तो मार्ग शाश्वत आणि निर्वेध नाही; पण सेवेने तुम्ही पुढे आलात तर तुमचे श्रेष्ठत्व कायम राहणार आहे. ते काढून घेण्यासाठी दुसऱ्याला तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ सेवाच करावी लागेल आणि अशा सन्मार्गात उत्पन्न झालेल्या स्पर्धेतून राष्ट्राचे कल्याणच होईल. जाणते लोक मागासलेल्या लोकांची उन्नती करण्याची आपली जबाबदारी विसरून त्यांच्या जिवावर चैन करण्याच्या मागे लागत आले, हेच पाप आज भारताला पदोपदी नडत आहे.
राजेश बोबडे