राजेश बोबडे
भारत साधू समाजाच्या कार्यक्रमांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांत शिरलेली विकृती नष्ट करण्याचा अंतर्भाव होता. ‘‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते. ते म्हणतात; ‘‘सिनेमा ही एक प्रभावी शक्ती आहे. ध्येयाचा अभिमान व माणुसकीची दृष्टी ठेवून जर सिनेमांची निर्मिती करण्यात आली, तर त्यायोगे जगात नवसमाज निर्माण करण्याचे कार्य खात्रीने होऊ शकेल. मात्र अद्याप तसे झालेले नाही. कोठे चमत्कारांचे बंड तर कोठे विषयांधतेचा सावळागोंधळ, कोठे माणसांना नाटकी बनविणारी कृत्रिमता तर कोठे ग्रामीण संस्कृतीची विकृती; अशा गोष्टीच दिसतात.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : धन्य भीम भगवान!
‘‘चांगला निष्कर्ष काढायचा म्हणून समाजसुधारणेचा विषय कोठे पाच मिनिटांकरिता येईल तर त्याच्या सोबतीला २५ मिनिटे समाजाला गर्तेत घालणारे रागरंग धुडगूस घालतील. त्यामुळे चित्रपटसृष्टीने काही अपवाद वगळता देशाची काही प्रगती केली, असे वाटत नाही. उलट लोकांना खर्च करण्यास उत्तेजन दिल्याचे दिसते. चित्रपट-निर्मात्यांनी आपली दृष्टी लोकोन्नतीकडे वळविल्यास अजूनही फार मोठे कार्य ते करू शकतात; आमच्या देशाला अन्न- वस्त्र समृद्धीच्या व प्रतिष्ठेच्या शिखरावर ते चढवू शकतात. अर्थात त्यासाठी सवंग लोकप्रियता व पैसे मिळविण्याची अपार हाव इकडे दुर्लक्ष करून ‘राष्ट्राची प्रचारकेंद्रे’ म्हणून या विषयाकडे त्यांनी दृष्टी वळविली पाहिजे आणि इतर साहित्यिकांनीही त्यांना तसे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. याचे कारण असे आहे की, आपण सर्व समाजाला बनविण्याची व बिघडविण्याची शक्ती संपादून बसलेले लोक आहात. हे साधन जेवढे लोकांना बिघडवते तेवढेच यातून सुधारणाही घडू शकतात, हे जर सरकार, नेते आणि धार्मिक समुदायाने समजून घेतले तर आपण अनोखी क्रांती घडवू शकतो. पण, आपण आपले राष्ट्र कसे घडवायचे आहे, हे त्यांच्या हृदयातही बसले पाहिजे. आपल्या शाळा, घरे, आश्रम, न्याय मंदिरे इत्यादी कशा असाव्यात? केवळ उद्योग, कला, जीवनशैली, संगीत आणि वादन एवढेच नाही तर या माध्यमातून आपण आपल्या इच्छेनुसार सर्व काही बनवू शकतो.’’
‘‘कीर्तन, भजन, सिनेमा, नाटक, नृत्य या सर्वांवर आपल्या देशाच्या संस्कृतीचा शिक्का बसला पाहिजे आणि या सर्वांमधून देशाच्या योग्य चालीरीती आणि धोरणे पुढे चालली पाहिजेत. हे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. मी सिनेमाच्या विरोधात नाही, पण त्याचा गैरवापर योग्य नाही. त्याच माध्यमातून अशी चित्रे आणि शब्द पोहोचवले जावेत, जे आज देशाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. धार्मिकतेच्या नावाखाली चमत्कारांनी भरलेली चरित्रे सांगूनही जनतेला प्रभावित केले जाते. त्यातही दुरुस्तीची गरज आहे. आपला देश मानवतेने सजवायचा आहे. त्याचे चित्र दाखवून जनतेला सदाचारी, सेवाभिमुख, समाजाभिमुख, व्यसनमुक्त आणि अध्यात्मप्रेमी बनवावे लागते. हे सर्व लक्षात घेऊन सिनेमात फरक करावा लागेल.’’
rajesh772@gmail.com