पतनशील पांडित्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘प्रत्येक माणसाचा उल्हास त्याच्या मनोवृत्तीवरच अवलंबून राहतो. साधूला जनतेने काहीही वैभव दिले असले तरी त्याच्या स्वभावगुणाप्रमाणे त्याच्या ठरवलेल्या वस्तूचाच तो प्रचार, विचार करणार. साधूंच्या मार्गाप्रमाणे व त्याच्या ध्येयधोरणाप्रमाणे कोणी त्यांच्यापुढे आणखी आत्मसुखशांती नेणार असतील, तर त्याला नाही म्हणणे शक्य नाही. पण तो जर ध्येयधोरणाचाच नसेल तर थोडाच काय, पूर्णही बिघडण्याचा संभव असतो, असाच अनुभव बहुधा आला आहे.’’
‘‘कोणाच्या विचारांत बदल होणेच शक्य नाही असे माझे म्हणणे नाही, पण विचार हा विचारानेच बदलत असतो. ज्या विचारात विचारच नाही अशा विचाराचा भरणा असणारेही लोक असतात व ते विचार आणि त्यांची धारणा यात जमीन आकाशाएवढे अंतर असते. म्हणूनच जे लोक निव्वळ घोकून जीवन जगत असतात त्यांचा तो विकासाचा मार्ग बंद असतो. म्हणजे रूढीवादी अथवा परंपरावादी अथवा उपांगवादी लोकांमध्ये बदल होणेच शक्य नाही, कारण ते आपल्या बोलण्याचा विचार करत नाहीत, त्यातील सारासार अर्थ काढीत नाहीत व पुढे जाणाऱ्यांना पुढेही जाऊ देत नाहीत, अशी ही दुनिया होऊ घातली आहे. या विषयात एक चर्चा करणे उचित आहे की मग माणसाला पुढे जाण्याला काही मार्ग आहे की नाही?’’
‘‘सर्व संतांचे व ग्रंथांचे मत आहे की ज्याची आर्त बुद्धी स्वभावाला लागली असेल, त्याला मार्ग मिळणे स्वाभाविक आहे. पण आपल्या गुणाचा, स्वभावाचा ज्याला गर्व झाला असेल त्याला मात्र इंद्रियभोग वासनापूर्तीचे वेड लागलेले असते व मग सन्मार्ग दाखविणारा प्रभावी गुरू मिळत नाही तोवर त्याचा मार्ग अधोमुखीच राहतो. जसा पडलेल्या लोखंडाच्या तुकडय़ाला चुंबकाचा स्पर्श नाही तोवर तो उचलणे शक्य नाही, तसा व्यसनांनी अधोमुख झालेला पुरुष सन्मार्गाच्या प्राप्तीशिवाय उन्नत होणे कठीण आहे. एरवी पक्षुपक्षी सर्वानाच आनंद आहे, उल्हास आहे, पण तो अतिसूक्ष्म व फारच थोडा वेळ टिकणारा आहे. त्याचे रूप इंद्रियांच्या स्वाधीन आहे.’’
‘‘आपल्या नोकराच्या स्वाधीन झालेल्या मालकालाही जशी नोकरबुद्धीच लाभते तसा आत्मवान माणूस इंद्रियाच्या स्वाधीन झाला की, त्याचेही स्वभाव इंद्रियरूपच होतात व मग तो स्थिर, अखंड उल्हासास पात्र होत नाही. म्हणून अखंड सुख इंद्रियांच्या मनाच्या अतिरिक्त प्राप्त केले पाहिजे. जे देहाच्या अवस्थेने बदलत नाही, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेद्रियांच्याही लहरीने हेलकावत नाही अशा निजात्मज्ञानाचा लाभ करून घेतला पाहिजे. जो लाभ जन्मोजन्मी व प्रत्येक क्षणाला आनंदरूप असा आहे. आत्मानंद सहज लाभला पाहिजे व त्याचे ज्ञान महापुरुषांकडून करून घेतले पाहिजे. जोवर इंद्रिये, मन यांना त्या विषयाचे आकलन होत नाही तोवर जे मिळाले ते ज्ञानही वृत्तीला समाधान देत नाही. मी असे महाज्ञानी पाहिले आहेत, ज्यांच्या वक्तव्याला तोड नाही व त्यांच्या समजावण्याला खोड नाही. साधकाला मंत्रमुग्ध करून देणारे हे ज्ञानी, स्वत:करिता एवढे खालच्या स्थितीवर असतात की नेहमी परिवाराची चिंता, धनामानाची चिंता वाहत असतात, एवढेच काय अत्यंत इंद्रियलोलुप असतात.- राजेश बोबडे