‘ही वेदांताची दिवाळी की दिवाळखोरी?’ असा प्रश्न करून देवधर्मविषयक विकृत कल्पनांची काजळी काढून टाकण्याचे आवाहन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘धर्म, देव, अवतार, अध्यात्म, आत्मान् ब्रह्म! हे सर्व ठीक आहे, पण प्रश्न एवढाच आहे की हे सर्व घुसळत बसण्याची वेळ कोणती? हे जोपर्यंत जनतेला व पुढाऱ्यांनाही कळत नाही तोपर्यंत त्या महत्त्वाच्या देवभक्तीला व धर्मज्ञानाला कवडी इतकीही किंमत नसते. देश आपत्तीत असता व्यक्तीने शब्दब्रह्माचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडावी यातच धर्म व देवसेवा आहे.’’
‘‘देवाधर्माविषयीचा विश्वास तरी किती विचित्र! तुम्हाला देवधर्मही तोच हवा, जो शूरांना नेभळट बनवतो आणि कर्तव्यवंताला निराश करतो? देवाधर्माची अशी विकृत व्याख्या करून त्यांच्या कल्पित सामर्थ्यांची व अवताराची वाट पाहात राहिल्याने व त्यांच्या मूर्तीपुढे फक्त नमस्कार घालत बसण्याने आता काय भागणार?’’ असा प्रश्न करून महाराज म्हणतात, ‘‘धर्म म्हणजे प्रत्येक देशकाल-परिस्थितीत ज्या ज्या मार्गानी जनतेचे भरण, पोषण व प्रगती होऊ शकेल असे सर्व न्याय्य मार्ग आणि ‘अवतार’ म्हणजे मागील बिघडलेले मार्ग झाडून किंवा देशकालानुसार योग्य अशी नवी वाट काढून लोकांना शांती व प्रगतीची जोड करून देणारे क्रांतिकारक महापुरुष! त्यांच्या नावांच्या नुसत्या माळा जपत बसल्याने काय होणार? आज तर भारतात नवे युग निर्माण होऊ घातले आहे; अर्थात आज भारतातील विचारधाराही त्याला पोषक अशीच वाहू लागायला हवी. देशात साहित्यही तसेच निर्माण व्हायला हवे. देवाधर्माच्या कल्पना, व्याख्याने- कीर्तने व उत्सवही त्याच मार्गाचा प्रभाव पाडणारे असले पाहिजेत. असा चहूबाजूंनी जोर पडेल तेव्हाच देशात सर्व मानवमात्र एक होऊन एक अभेद्य तट निर्माण करतील, ज्यात शत्रूला जागा मिळणार नाही आणि आदर्श नवयुग उदयास येण्यात अडचण राहणार नाही, हे निर्विवाद आहे. अशी खरीखुरी आनंदाची दिवाळी साऱ्या भारतवर्षांत निर्माण व्हावी, असे नाही का वाटत? मग सचोटीचा आचार आणि सत्याचे संशोधन याशिवाय हा असला नेभळा व उदासवाणा वेदांताचा अर्थ हृदयाशी धरल्याने काय लाभ होणार?’’
‘‘याच वेदांताशी, धर्माशी व देवावतारांशी संलग्न होऊन पूर्वजांनी दुष्टांना शासन केले, स्वातंत्र्य मिळवले, आपले सत्याचे ब्रीद आणि जगाचे आदर्श गुरुपद राखले, पण तत्त्वाला कुठेही बाधा येऊ दिली नाही. प्रसंगी सवर्ण व मागास, पुढारी व जनता, देव व भक्त एक होऊन त्यांनी दुष्टांच्या मनोवृत्तीचा पाठलाग केला व खऱ्या धर्माची म्हणजे सत्याची संस्थापना केली, पण आश्चर्य हे, की त्याच थोरांच्या संप्रदायांना व देवाधर्माना हृदयाशी धरून आम्ही आपल्या घरात हा आळस नि भित्रेपणा कसा वाढवला? दगडामातीच्या देवापुढे डोके ठेवून वाईट लीला तेवढय़ा शिकलो! जे आवश्यक ते सर्व सोडून देण्याची प्रवृत्ती आमच्यात भरून राहिली! आता तरी या सर्व दुर्गुणांना आळा घालून आम्हाला कर्तव्यतत्पर व्हायला नको का?’’
राजेश बोबडे