मी देव मानत नाही, मी धर्मनिरपेक्ष वगैरे आहे असे सांगून घरात गुपचुप पूजापाठ, कर्मकांड करणाऱ्यांची संख्याही काही थोडीथोडकी नाही. १९६७ साली नागपूर येथे वारकरी संप्रदायातील ब्रह्मलीन जोग महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जगाची स्थिती फारच चिंताजनक आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातून एवढेच नव्हे तर निसर्गातूनही एक फार मोठा कोलाहल सुरू आहे. सामाजिक कोलाहलाचा एक नमुना उदाहरण म्हणजे मोठमोठय़ा समाध्या व मठ. याची आज काय गरज आहे? दु:खितांचे सांत्वन संत, महात्मा, थोर पुरुषांचे हितोपदेशाचे चार शब्द ऐकल्याने होत असते.’’
‘‘भक्तिभावाचा असा हा सुंदर प्रसंग साजरा करण्याकरिता एकोप्याची आवश्यकता असते. परंतु आजची समाजाची स्थिती अशी विचित्र आहे, की एकोप्याने वागण्यात अडथळेच जास्त येतात. चार माणसे एकत्रित येऊन हिंदूू धर्म, भारतीय संस्कृती आदींचे हावभाव अंगी उतरवण्याऐवजी तोडातोडी करण्याचीच शक्यताच अधिक असते. सध्या नवीन विचारांची एक लाट उसळली आहे. ‘मी सांप्रदायिक नाही’, ‘मी देवाची भक्ती करीत नाही’ असे अभिमानाने म्हटले जाते, परंतु हे केवळ ढोंग आहे. उत्तम तऱ्हेने कोणी तरी दिशा दाखवावी म्हणून कोणत्या ना कोणत्या देवाचे भक्त व्हावेच लागते. कोणत्या ना कोणत्या तरी साधूचे, महापुरुषाचे शिष्यत्व पत्करावेच लागते. माणुसकीला सोडून चालता येत नाही. भगवान कृष्णाने हे स्वत: सांगितले आहे. सर्व देवांचा अध्यक्ष म्हणून ज्याचा साधूसंत, विद्वान मोठय़ा अभिमानाने गौरव करतात तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेत स्वत: म्हणतो की, ‘तुम्ही कोणत्याही देवाचे भजन करा. ते सर्व देव त्या त्या रूपाने मलाच येऊन मिळतात.’ आजच्या कालानुरूप भागवत धर्माने हीच शिकवण दिली आहे.’’
‘‘एक काळ असा होता की संन्याशांचा सुळसुळाट झाला होता. पूर्ण वैराग्य अंगी आल्याशिवाय संन्यासी होता येत नाही. लहान मुलांपासून सर्व सन्यासीच होऊ लागले. अनाचार वाढू लागला. त्या वेळी भागवत धर्माने हाक दिली. ‘नका सांडू बाया पोरे, महाल माडय़ा बांधा घरे, आल्या अतिथा आदरे, याहूनि नेम कोणता?’ असे सांगितले. एकटे राहून उपद्रव करण्यापेक्षा बायकामुलांसहित आनंदाने संसार थाटूनही देवाचे भजन करू शकता हे शिकविण्यासाठीच भागवत संप्रदाय उदयास आला. भगवान धावून येतो तो सामान्यांच्या भावना जागविण्यासाठीच. ‘आपले सर्व काम धंदे सोडा व माझे नाव घ्या’ असे तो कधीही म्हणाला नाही,’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात-
आम्ही मुख्यत: कार्यप्रेरक।
चालती आम्हां ऐसे नास्तिक।
ज्यांचा भाव आहे सम्यक।
‘सुखी व्हावे सर्व’ म्हणूनि॥
भलेही तो देव न माने।
परि सर्वा सुख देऊं जाणे।
मानवासि मानवाने।
पूरक व्हावें म्हणूनिया॥
राजेश बोबडे