विदर्भातील चिमूर व आष्टी येथे इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून तेथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तिरंगा फडकविला. इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण शहीद झाले. महाराजांना रायपूरच्या तुरुंगात डांबले. १४ ते १६ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस का होईना चिमूर व आष्टी १९४७ पूर्वीच स्वतंत्र झाले होते, असे म्हणता येईल. महाराजांच्या या क्रांतिलढय़ाची माहिती बर्लिन रेडिओवरून आझाद हिंदू सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जगाला दिली होती.
१९५३ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिंतन व्यक्त करताना म्हणतात, ‘‘आपला हा १५ ऑगस्टचा दिवस एक महान आनंदाचा सण आहे. परंतु दु:खाची गोष्ट आहे की, हा उत्सव ज्या उत्साहाने सुरुवातीस करण्यात आला तो तसा उत्साह आज दिसत नाही. कारणे पुष्कळ आहेत आणि ती पुढाऱ्यांच्या तोंडून ऐकून सर्वानाच पाठ झाली आहेत. राज्यकर्त्यांना कितीही अडचणी असल्या तरी जनतेच्या अडचणी जनतेला त्याहून महत्त्वाच्या वाटणे साहजिक आहे. पण या गोष्टीचा कुठे तरी मेळ बसविलाच गेला पाहिजे, पण हे ज्यांनी करायला हवे, ते लोक आज वेगवेगळय़ा पक्ष, संस्थांच्या झगडय़ात पडून जनतेत विष पेरत आहेत, फूट पाडत आहेत. इकडे कष्ट करून मरणारे मरतात बिचारे; पण पुढाऱ्यांची व्याख्याने जोरात सुरूच आहेत. दुसरीकडे लाचखोरी, अत्याचार, शोषण, कुटिल कारवाया यांना भरती आली आहे; पण त्याकडेदेखील कोणी डोळे उघडून पाहायला तयार नाही. आपापले खिसे गरम करण्याकडेच जो तो झुकला आहे.’’
‘‘ज्याला त्याला पुढच्या निवडणुकीची धुंद आली आहे. जनता अज्ञानी आहे या समजुतीने आज हा गोंधळ सुरू असला तरी प्रत्येक पुढाऱ्याने आता हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की यापुढे हा तमाशा फार वेळ टिकणार नाही. लोक स्वत:चे सामथ्र्य असंघटितपणामुळे ओळखत नसले तरी लहानशा खेडय़ातील माणूसदेखील तुमची सोंगे स्पष्टपणे ओळखतो. त्याच्या हृदयात चीड धुमसू लागली आहे. यापुढे तुमच्या निष्क्रिय व्याख्यानांना कवडीचीही किंमत राहणार नाही आणि व्यासपीठावरून कोण केव्हा खाली ओढेल याचा नेम नाही. सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच प्रजातंत्र राज्याची जबाबदारी ज्या लोकांकडे आहे त्यांनीदेखील वेळीच सावध झाले पाहिजे.’’
‘‘आता नुसते वकिली पद्धतीने समर्थन करून आणि मोठमोठाल्या योजना सुचविणारी व्याख्याने ठोकून भागणार नाही. लोकांच्या प्राथमिक गरजांकडे इमानेइतबारे लक्ष पुरविण्यात आले तरच आमच्या स्वातंत्र्याला खरी किंमत मिळू शकेल. महाराजांनी ९ ऑगस्ट १९४२ च्या क्रांतिलढय़ात अभूतपूर्व रंग भरला. बासरी सोडून द्या, बना चक्रधारी,’’ असा संदेश देऊन महाराजांनी इंग्रजांना उद्देशून म्हटले,
अब काहेको धुम मचाते हो
दुखवाकर भारत सारे।
झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना।
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेंगी किनारे।।
राजेश बोबडे