राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या पंतप्रधानापासून लॉर्ड माउंटबॅटनपर्यंत, दीनदुबळय़ांपासून राजे-उमरावांपर्यंत, सर्वांनाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवता धर्माचे पाठ दिले. अंत्यवस्थेत भेटणाऱ्यांना तुकडोजी महाराज म्हणाले, ‘‘आजपर्यंत मी तुम्हाला जगावे कसे हे शिकविले; आता मरावे कसे हे शिकवितो. तुम्हाला त्यासाठी ‘ग्रामगीता’ वाचावी लागेल.’’ यशवंतराव चव्हाण महाराजांना म्हणाले, ‘‘आपल्या आजाराबद्दल मला चिंता वाटते.’’ त्यावर महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही चिंता करा भारताच्या आजारांची; अनेक रोगांनी ग्रासला आहे तो! माझ्या मते त्यावर रामबाण उपाय आहे सामुदायिक प्रार्थना, ज्यामुळे पक्ष-पंथ-जाती-धर्म  यांच्यात एकात्मता येईल आणि समस्या सुटतील.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : वाङ्मय करोडोमुखी जाऊ द्या..

मानवजातीच्या व राष्ट्राच्या कल्याणासाठी आपला देह आयुष्यभर झिजविणाऱ्या तुकडोजी महाराजांना स्वत:पेक्षाही देशाबद्दल किती तळमळ होती, हेच यातून दिसते. महाराज म्हणतात, ‘‘मृत्यू म्हणजे तरी काय? ज्ञानवान पुरुषासमोर मृत्यू काहीच नाही. कबीरांनी म्हटले आहे- ‘पानी में पानी मिल जावे। मैं तो पूछूं उस भाई से, दोनो में मर गया कौन?’ पंचतत्त्वात पंचतत्त्वे विलीन होतात, तेथे मरतो कोण? मरण म्हणजे देहाचा वियोग! आम्ही लाखो- शरीरे आजवर घेऊन सोडली, हेही सोडून जाऊ तेव्हा त्याचे दु:ख काय? कारण, शरीर तयार – करणाऱ्या अळीची कितीतरी स्थित्यंतरे होताना दिसतात. ती एक कोष तयार करते; आमचा चेतन आत्मा तर हजारो वेळा कोष तयार करून फेकतो, शरीरे धारण करून जीर्ण वस्त्राप्रमाणे झुगारून देतो. हे लक्षात आले की, आनंदाला सीमा राहात नाही; दु:ख आहे ते आसक्तीचे! मृताबद्दल आपण रडतो ते अज्ञानजन्य आसक्तीमुळेच. मुलांचा खेळ मोडला की ती रडतात, तसेच आपले आहे. जाणत्या माणसाला एक घर मोडले तरी दुसरे उत्तम लाभेल म्हणून आनंदच होईल!

हेही वाचा >>> चिंतनधारा : ‘युनेस्को’ परिषदेत राष्ट्रचिंतन

दु:खच व्हायचे तर ते असे चालेल की अरेरे, मी माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करायच्या त्या करू शकलो नाही! आम्ही लोक असे मृत्यूच्या नावाने भिणारे नाही. जाणे-येणे हा काही मोठा प्रश्नच नाही. पण कशासाठी यावे? जसे बाकीचे लोक वासनेच्या मार्गे बळी जातात, मरतात; तसे मरणाऱ्यांपैकी काही आम्ही लोक नाही. आणि म्हणून मी लिहून दिले की, या संस्थेचे काय करावे, पैशाचे काय करावे, या मंडळाचे काय करावे.

आता केवळ तुम्ही अव्याहत सेवाकार्य केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’’ व ‘‘अवघाचि संसार, सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।’’ हेच आमचे महामंत्र आहेत!’’ महाराज लिहितात,

मर जायेंगे तो क्या हुआ?

मरना ही तन का हक हैं।

इस लोक की यात्रा हमारी,

सफलता से हो गयी।

इच्छा-अनिच्छा कुछ नहीं,

गुरुदेव की मर्जी रही।।

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara rashtrasant tukdoji maharaj taught lesson about humanity religion zws
Show comments