राजेश बोबडे

साहित्याच्या एकांगी प्रगतीविषयी परखड विचार मांडतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्वज्जनांच्या कर्तव्याबद्दल म्हणतात; ‘विद्वान पुरुष आपल्या विचारांच्या अत्युच्च शिखरावरून जगात पाळणे सोडून दोर हलवू इच्छित असतात. परंतु त्यांच्या व जगाच्या मध्ये अनेकविध मतांची व रूढींची बंधने पुरातनकाळापासून वृद्ध वृक्षांप्रमाणे उभी असल्यामुळे त्यांनी दिलेले हे झोके लोकांपर्यंत पोहोचणे नेहमीच दुरापास्त असते. म्हणूनच जगावर विद्वानांचा व्हावा तसा परिणाम होत नाही.’

‘इकडे सामान्य जनसमूहास, महापुरुषांप्रमाणे वर चढण्यासाठी म्हणून कमकुवत मार्ग त्यातीलच अल्पाभ्यासी किंवा दांभिक लोक लोभाच्या आशेने सांगत सुटतात. त्या आधारावर बिचारे मोठय़ा खुशीने थोडे दूर जाऊन वर पाहतात तेव्हा तो मार्ग दिसेनासा होतो. त्यामुळे निराशेने एक तर ते अधोगामी होतात किंवा फजिती होऊ नये म्हणून तेच जगाचे शेवटचे शिखर समजून महत्त्व मानून घेतात. अशा तऱ्हेने थोरांमध्ये व सामान्यजनांमध्ये सारखे अंतरच राहत जाते. हीच परंपरा जर जगात चालत राहिली तर विद्वानांना शब्दसृष्टी किंवा विचारविलास मोठा आणि अविद्वानांना व्यवहार मोठा असा भेदच राहील. विद्वानांच्या विद्वत्तेचा सामान्यजनांस काही उपयोगच होत नसेल तर त्या विद्वत्तेची किंमत तरी काय?’असा प्रश्न महाराज विचारतात.

‘सामान्यजनांस काहीतरी उपयोग होईल की नाही याची पर्वाही न करता वाङ्मयात भरमसाट भर घालणारा विद्वान आणि कष्टाने पाच पैसे मिळवून श्रद्धेने एक पैसा विद्वानांना देणारा सामान्य मनुष्य, यांत औदार्य अधिक कोणाचे, हा प्रश्न कुणालाही पडेल! वास्तविक अज्ञानी जनांस समुचित सन्मार्ग दाखवण्यातच विद्वत्तेची सफलता आहे. तेव्हा या दृष्टीने स्वत:च्या सद्विचारांना सामान्य जनसमूहाच्या गळी उतरवण्यासाठी सक्रियतेने झटा व व्यवहार आणि उच्च विचार यांच्यामध्ये पडत गेलेले अंतर दूर करा,’ अशी विनंती महाराज विद्वानांना करतात आणि असेही स्पष्ट करतात की, ‘वास्तविक विद्वानांच्या साहित्यात उगीच हात घालून ढवळाढवळ करावी किंवा त्यांच्या लेखणीला उगीच मागे ओढण्याचा प्रयत्न करावा असा माझा मुळीच हेतू नाही. परंतु आपल्याबरोबर जगाचेही कल्याण व्हावे असे ज्या ज्या विद्वानांना वाटत असेल, त्यांनी मागासलेल्यांकरिता आपल्या शक्तींचा उपयोग करावा. समाजातील सर्वामध्ये समन्वयासाठी महाराज आपल्या भजनात म्हणतात,

विद्वानांनो! व्यक्तिसुखास्तव,

       ही विद्वत्ता नाही तुम्हा।

असतील जे जे अनपढ कोणी,

       शिकवुनी त्या विद्वान करा।

तरीच फिटे हे! ऋण देशाचे,

       हे का माहीत नाही तुम्हा।।

घराघरांतुनि भारतवासी,

       नीटनेटका जव दिसला।

तुकडय़ादास म्हणे त्या दिवशी,

       शिरसावंद्य तुम्हीच आम्हा।।

rajesh772@gmail.com