राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महापुरुषांना इशारा देऊन सावध करताना म्हणतात, ‘‘लोक ज्या भावनेने आपल्या जातीचा गौरव, गौरवातीत होऊन गेलेल्या थोरांच्या नावाने करतात ती भावना अपूर्ण आहे. याकरिता त्यांनी तो गौरव सदाचरणाने व त्यांच्याच वागणुकीच्या अनुकरणाने करून दाखवावा एवढाच माझा आग्रह आहे. थोरांच्या अधिकाराला केवळ निष्क्रिय सांप्रदायिकत्व येणे किंवा त्यांच्या दैहिक जातीच्या नावाने पक्ष निर्माण होणे यापेक्षा देशाचे पतन ते कोणते? अनेक ठिकाणी हे उद्गार आपण ऐकतो की, ‘‘अहो महाराज तर आहेत ते, पण कोणत्या जातीचे आहेत? ते जर आपल्या जातीचे किंवा आपल्या संप्रदायाचे असतील तरच आपण त्यांची स्तुती करावी. एरवी जरी ते मोठे अनुभवी असले तरी आपल्यासाठी कुचकामीच आहेत,’’ असे समजणे म्हणजे आपणांत विद्वत्ता असूनही आंधळेपणा दाखवणेच नव्हे काय?
खरे तर हे आहे की मला नेहमी अधिकारी लोकांच्या जवळ बसलेला बहुसंख्याक मेळा बगळय़ा लोकांचाच दिसतो. त्यांची वृत्ती याच विचारात असते की, त्या महात्म्याच्या जवळच्या धनाचा फायदा आपणास कसा मिळेल, त्याच्या थोरपणाचा फायदा आपला मोठेपणा दाखवण्यात कसा करून घेता येईल, त्याच्या आश्रयाने आपली व्यसने कशी पूर्ण करून घेता येतील इत्यादी. हीच वृत्ती अधिक प्रमाणात- साधुसंतांच्या जवळील लोकांतच नव्हे तर पुढारी म्हणवणाऱ्या लोकांच्या आसमंतातही आढळून येते. असे लोक तर कुठेही विरळाच दिसतात की, जे त्यांच्या सद्बोधाचा आपल्या आचरणावर परिणाम करून घेतात आणि त्यांच्या विचारपूर्ण आज्ञेप्रमाणे तंतोतंत चालतात. मला सखेद आश्चर्य वाटते की, ही गोष्ट या थोरामोठय़ांच्या दृष्टीत का उतरत नाही? ‘लोक माझा अशा तऱ्हेने फायदा का घेतात आणि मला माझ्या उद्देशापासून पदच्युत का करतात’ असा प्रश्न त्यांना का पडू नये?’’
महाराज म्हणतात, ‘‘माझा बहुधा असा अनुभव आहे की, साधारण सद्वृत्तीच्या साधकाला किंवा अभ्यासू भोळय़ा पुरुषाला पतनाला नेण्यास विशेष कारणीभूत होणारे जर कोणी असतील तर ते त्यांच्या तोंडाशी व कानाशी लागलेलेच लोक असतात. लौकिकदृष्टय़ा तरी त्याचा परिणाम लोकांच्या हितानुकूल होत नाही. मला यात साधूंची तुलना दाखवावयाची नाही, परंतु साधारण लोक जे बाहेरच्या दृष्टीने पाहणारे असतात ते बहिरंगाकडे पाहूनच आपले मत तयार करतात आणि त्यानुरूप वागणूकही करू लागतात. अर्थात ते बहिरंग जातीयता, धर्म, पक्ष अथवा भोवतालचे वातावरण यांचा वेगळाच (विपरीत) उपयोग करून घेणारे अधिक असतात. ते साधूंच्या आणि शूरांच्या साचात कधीच बसू शकत नाही. असे होऊ नये एवढेच मला सुचवायचे आहे.’’ महाराज ग्रामगीतेत लिहितात..
संतास नाही जात-परजात।
विश्वकुटुंब संतांचे गोत।
जे जे भेटतील ते आप्त।
सुहृद त्यांचे।