राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत महिलोन्नती नावाचा स्वतंत्र अध्याय रचला. महिला स्वयंरोजगार, लाठीकाठी प्रशिक्षण, महिला संरक्षण दल, भाषणकला, मुलींसाठी शाळा व वसतिगृह, महिलांद्वारे संचालित गुरुदेव उद्योग मंदिर, असे उपक्रम त्यांनी देशपातळीवर राबविले. श्रीगुरुदेव महिला सेवा मंडळ ही स्वतंत्र शाखा स्थापन केली. श्रीगुरुदेव महिला मंडळ भारतव्यापी व्हावे असा महाराजांचा दृष्टिकोन होता.

‘‘पुरुष जर सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्याचा भार वाहू लागले तर, स्त्रियांनी त्यात भाग न घेता, घरकाम व इतर बालसंगोपनादी महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित करण्यातच स्वत:ला वाहून घेणे इष्ट नव्हे काय? तीही त्यांची राष्ट्रसेवाच होईल ना?’’ या शंकेचे निरसन करताना महाराज म्हणतात, ‘‘विवक्षित प्रसंगी एवढेच करणे जरी महत्त्वाचे ठरत असले तरी त्याचा अर्थ स्त्रियांनी हेच जीवन मानावे, असा नाही. अशी अपेक्षा केवळ दुराग्रहच आहे. प्रसंगी पडेल ती उचित समाजसेवा करण्याचे व प्रतिपक्षीयांशी लढा देण्याचेही सामर्थ्य महिलावर्गात असावयास हवे आणि त्यासाठी प्रथमपासूनच या गोष्टीचा अभ्यासही हवा. स्त्री संरक्षणाची हमी स्वत:कडे पूर्णतया घेऊन पुरुषांनी केवळ स्त्रियांनाच परावलंबी व दुबळे केले असे नाही, तर त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पुढील पिढीलाही तेच वळण व संस्कार मिळत राहून राष्ट्राचा सर्वस्वी अध:पात होत गेला. या महापातकाची जबाबदारी आमच्या अरेरावी करणाऱ्या व दूरदृष्टीचा अभाव असणाऱ्या पुरुषवर्गावरच आहे. वीर हवेत तर वीरमाताही हव्यात,’’ असे महाराज सांगतात.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : जय शोभराज!

ते म्हणतात, ‘‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा किंवा समाजसेवेच्या तत्परतेचा स्पर्श झालेला नसेल, त्यांच्यात हे संस्कार बाणलेले नसतील, तर त्या आपल्या बालगोपाळांत त्यांची पेरणी करू शकणार नाहीत आणि मातेच्या दुधातून ते अमृतपान त्यांना मिळाल्याशिवाय राष्ट्रात ती तेजस्विता कायम राहणार नाही. आज जगाच्या इतिहासात दृष्टी खेळवल्यास दिसून येईल की जे पुरुष वीर, संत, मुत्सद्दी, समाजधुरीण किंवा श्रेष्ठ म्हणून गाजले आहेत त्यांच्या मातांमध्ये ते ते गुण बीजरूपाने वसत होतेच.

कार्यात स्त्रियांनी तत्पर असावे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, पण यामुळे जर घरगुती काम मागे पडत असेल किंवा स्त्रियांना त्यात कमीपणा वाटत असेल तर त्याचा परिणामही अनिष्टच होणार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवावी. चूल व मूल सांभाळले म्हणजे झाले असे नुसते म्हटल्याने काम भागत नाही. प्रत्येक स्त्रीला लिहिता वाचता आले पाहिजे. आपले विचार निर्भयपणे सभेत बोलून दाखवण्याइतकी तिची तयारी असली पाहिजे. महाराज ग्रामगीतेत म्हणतात-

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी।

तीच जगाते उद्धरी।

ऐसी वर्णिली मातेची थोरी।

शेकडो गुरुहूनिही।।

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara rashtrasant tukdoji maharaj visionary approach on women empowerment zws
Show comments