राजेश बोबडे
काही सज्जन तीर्थासि जाति
अस्थिराख भरोनि नेती ।
अंधश्रद्धेसि वाढवूनि ।
धूर्त घेती स्वार्थ साधूनि ।।
पंडयाचि व्यसनी ।
दुराचारी फुकट लुटाया खटपट करी ।
‘म्हणोनि आधंळा कर्मठपणा ।
वाढवुचि न द्यावा कोणा’ ।।
अर्थात यासाठी साधन बदलावे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ठरविले. पितरांना स्वर्गात पाठविण्याच्या नावावर तीर्थक्षेत्रातील होणाऱ्या फसवणुकीला फाटा देण्यासाठी त्यांनी गुरुकुंज आश्रमात सर्वतीर्थ अस्थिकुंडाचे निर्माण केले. कुंडाचे योगीपुरुष स्वामी सीतारामदास महाराज यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कुंडात गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा यासारख्या प्रमुख ४० नद्यांचे जल अर्पण करण्यात आले. कर्मकांडातून लोकांची सुटका व्हावी व पुनर्जन्माच्या खुळचट संकल्पनांना कायमची तिलांजली मिळावी हा उद्देश होता. तेव्हापासून येथे आप्तेष्टांच्या अस्थींचे विसर्जन पहाटे करण्यात येते. महाराज तीर्थक्षेत्राबद्दल म्हणतात प्रत्येक गोष्टीची दोन रूपे असतात, एक तात्त्विक व दुसरे विकृत. एक महात्मा पवित्र भगवी वस्त्रे परिधान केलेला, सुंदर जटा, भस्म व मालांनी युक्त असा महान तपस्वी असू शकतो; हे त्या वेशाचे तात्त्विक रूप झाले. पण त्याच वेशात एखादा डाकू व चोरही राहू शकतो; ही त्याची विकृती होय. ती झाडण्यासाठी आम्ही त्या वेशावर टीका करीत असलो तरी, त्याचे तात्त्विक स्वरूप विसरून चालणार नाही.
हेही वाचा >>> चिंतनधारा : ‘भूदान’ हा आजचा युगधर्म व्हावा
तीर्थाचेही तसेच आहे. तीर्थाचे ठायी आज अनेक हीन प्रकार चालू असले तरी मुळात तीर्थाला भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. घोटाळे केले ते लोकांनी, तीर्थानी नव्हे. माणसे बिघडली पण तीर्थाचे मूळ रूप नष्ट झाले नाही. त्याचा फायदा अजूनही घेता येतो आणि त्यासाठी माणसाने अवश्य फिरायला पाहिजे. त्या प्राचीन गोष्टीचे स्मरण करून देणाऱ्या वातावरणात जे दोष निर्माण झाले ते दूर सारून त्यातून सत्य वेचून घेतले पाहिजे. तीर्थास जाऊन तेथून ‘तीर्थी’ आणण्याची प्रथा समाजात रूढ आहे. तीर्थीच्या रूपाने तेथील वातावरणाचा प्रभाव आणावयाचा आणि तीर्थीपूजनाच्या निमित्ताने तो समाजास द्यावयाचा असे त्यातील इंगित आहे. तीर्थयात्रा करणे ही आमच्या जीवनातील एक आवश्यक बाब संतांनी करून ठेवली, त्यात मोठा अर्थ आहे. तीर्थे ही भारतीय संस्कृतीची विद्यापीठे होती. त्या उच्च स्थानावरून जीवनाचे पवित्र झरे आमच्या देशातील गावागावांत पसरत होते. यात्रेच्या निमित्ताने देशाचे दर्शन आणि आपत्तींना तोंड देण्याचे सामर्थ्य लोकांना प्राप्त होत होते. प्रत्येक तीर्थात संतसंमेलने होऊन लोकांना निर्मळ ज्ञानाचा लाभ मिळत होता. पण कालांतराने रूढींना महत्त्व येत खरा प्रभाव लोपत गेला. ज्ञानज्योती जागती होती तोवर बट्टा कोण लावणार? पण पुढे क्रियाकर्माचेच अवडंबर माजले आणि मुख्य गोष्ट दृष्टिआड झाली. तीर्थाचे सौंदर्य, वातावरण आजही कायम आहे; तेच नियम आजवर चालत आले आहेत; पण आत पोकळपणा निर्माण झाला. वेश तेच, डय़ुटी तीच, पण शिपायाची कार्यतत्परता जणू विराम पावली.
rajesh772@gmail.com