राजेश बोबडे
१९५५ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपानमधील विश्वधर्म व विश्वशांती परिषदेला संबोधित केले. विश्वधर्माबद्दल महाराज म्हणतात : आज विश्वाला बंधुत्वाची, शांतीची, प्रेमाची तीव्र भूक लागली आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. परंतु मला हे कळत नाही की, जगात इतके धर्मच मुळात उत्पन्न का व्हावेत? प्रत्येक मानवाचा उद्धार काही वेगळय़ा प्रकारचा असू शकतो? प्रत्येक माणसासाठी शांतिसुख काही वेगळे असू शकते ? गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, भगवान श्रीकृष्ण, महंमद पैगंबर इत्यादि धर्माचार्य काय लोकांना परस्परांचे विरोधी बनविण्याचे काम करू शकतात? ही गोष्ट मला कधीही मान्य व्हायची नाही! सर्वाचा उद्धार, सर्वाची सुखशान्ति ही एकच असू शकते आणि सर्वाच्या हितासाठी सांगितलेला मार्गही एकच असू शकतो;
मग त्याचे बाह्य स्वरूप हे देशकालभेदाने कितीहि वेगवेगळे दिसेना का! जगातील हे सर्व धर्माचार्य माणसाला आकुंचित- परस्परांपासून भिन्न बनविण्यासाठी अवतरले नव्हते; त्यांना सर्व मानवांना परस्पर सहायक बनवून जगात प्रेमसुखाचे ईश्वरी राज्य निर्माण करावयाचे होते. विश्वधर्माची धारणा आणि ईश्वरी नियमांची प्रेरणा अखिल मानवसमाजास देण्याचेच त्या महापुरुषांचे कार्य होते! असे असताना आज मनुष्याला मनुष्याच्या रक्ताची तहान का लागली आहे? धर्माच्या नि देशाच्या नावावर आपल्याच मानव बांधवांचा संहार तो का करत आहे? मी तर असे मानतो की, त्या महापुरुषांच्या विशाल दृष्टीचे आकलनच मानवांना झाले नाही; म्हणून तर प्रेमासाठी जन्मास आलेला मनुष्य शेवटी विश्वातील समस्त लोकांना आत्मसात् करण्यास कमकुवत ठरला, भिन्न वेषभूषा पाहून गोंधळला, सर्वाची पूर्ण व्यवस्था लावण्यास विसरला – अपुरा पडला!
दुसरेही एक महत्त्वाचे कारण घडले. त्या महापुरुषांच्या नावावर बिनाश्रमाने जगू इच्छिणाऱ्या काही सांप्रदायिकांनी मुद्दाम आपला धर्म अलग ठेवून विरोधाला पीळ दिला, मानवांना विशाल दृष्टी कळू न देता अलग पाडले त्यांच्यात द्रोह निर्माण केला! असे नसते तर, हे सर्व प्रेमपूर्ण वृत्तीचे सरळ लोक – निरागस मुले- मुली, उत्साही तरुण-तरुणी, शांतिप्रिय वृद्ध स्त्रीपुरुष – परस्परांहून भिन्न किंबहुना एकमेकांचे वैरी का झाले असते? जपान, हाँगकाँग, बर्मा (म्यानमार), भारत – सगळीकडे प्रेमधर्मासाठी आतुर असलेले, ईश्वरश्रद्धेने ओथंबलेले नि प्रेमी मानवांच्या भेटीसाठी हृदयाची दारे उघडून वाट पाहणारे लोक मला सारखेच दिसतात. पण हे सर्व परस्परांना आत्मसात् मात्र करू शकत नाहीत, याचे कारण काय? आपल्या खऱ्या धर्मतत्त्वाचे, महात्म्यांच्या विशाल हृदयांचे ज्ञान नसणे आणि व्यक्ति-गट- राष्ट्र यांच्या आकुंचित स्वार्थाने बेहोश होणे, याच पापांचे हे फळ आहे! यामुळे जगात आज विरोध, अशांति थैमान घालीत आहे.
महाराज आपल्या भजनात म्हणतात :
ऐ विश्वके चालक प्रभो।
मुझमें समझ दे विश्वकी।
इस अखिल मानव-धर्मके,
आदर्श ऊँचे वेष की ।
दु:ख है हमें, ‘हम अवनती क्यो पा रहे?’