राजेश बोबडे

सेवेच्या विविधांगांविषयी व्यक्त होताना, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाषणातून सत्तालोलुपांना उद्देशून सेवेतून क्रांतीची वाट दाखवताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात- ‘देशात हीच खरीखुरी समाजक्रांतीची वेळ आहे. या काळात केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी नुसता थोरामोठय़ांचा जयघोष, दिखाऊ कामकाज किंवा पाताळयंत्री कारवाया करण्याऐवजी, प्रामाणिक जनसेवा व सार्वत्रिक लोकजागृती करणार नसाल तर तुमची सत्ता व तुमचा पुढारीपणा हवेच्या झुळकेप्रमाणे झर्रकन उडून जाईल आणि डोळे खाडकन् उघडतील, वाटेल की- काय नि कसं झालं हे! पण मग काय उपयोग? यासाठी तुम्हाला आजच इमानेइतबारे जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत. नव्या काळाबरोबर पुढे जाण्यासाठी तुमची गात्रेच जर ढिली झाली असतील तर मार्ग अडवून ठेवण्याचे तरी बंद केले पाहिजे. आमच्याशिवाय समाजाला कोण वाली आहे, म्हणून स्वत:च फुशारकी मिरवून हे रस्ते तरी का अडवून ठेवता?’ आपल्या मागील शक्तीच्या वा व्यक्तीच्या भरवशावर जगणाऱ्या सर्वानाच महाराजांचे असे स्पष्ट सांगणे आहे, मग ते गांधीभक्त असोत की अन्य पक्ष, पंथवादी असोत.

महाराज म्हणतात, ‘महात्माजींच्या अनुयायांनाच नव्हे तर अनेक पंथांच्या, संप्रदायांच्या, जातिधर्माच्या व पक्षांच्या व्यक्तींना क्रांतिकालाकडे दृष्टी ठेवून लोकहितासाठी कार्य करण्याची मी जी विनंती करीत आहे, त्याचे कारण असे आहे की, आजचा समाज अनेक आपत्तींनी गांजला असूनही जनता आपल्याच तंद्रीत मग्न आहे. आपले पुढारीपण टिकविण्यासाठी थोरामोठय़ांची नावे उपयोगात आणीत आहे. मी प्रत्यक्ष पाहतो की आज समाजात अशांतता, अनैतिकता, अविश्वास, अत्याचार व प्रलोभनासक्ती आदी गोष्टी अशा थराला जाऊन पोहोचल्या आहेत की ज्यामुळे जग पाशवी शक्तीच्या हातूनच भस्मसात होऊन जाईल! एखादा महापुरुष आपल्या दैवी शक्तीने नि:स्वार्थी प्रचारकांकरवी जनतेचा स्वभावपालट करू शकल्यास गोष्ट वेगळी. अशा स्थितीत आमचे सर्व नेते व भक्त जर आपल्यापुरतेच पाहतील आणि उन्नतीच्या कार्यात अडथळे आणतील तर जगाच्या नाशाचे पापभागी आपसूकच ठरणार नाहीत का? सेवेतून क्रांतीची बिजे रुजवताना पुढाऱ्यांबरोबरच पूज्यपुरुषांनाही महाराज आपल्या ग्रामगीतेतून इशारा देतात-

जगांत जेवढे पूज्यपुरूष झाले।
ते सर्व सेवेनेचि गौरव पावले।
सेवा सोडतांचि राक्षस ठरले।
मारले गेले देवाकरवीं।।

rajesh772 @gmail. com

Story img Loader