राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सर्वात अधिक महत्त्व आचाराला आहे. गुरू, देवता, ग्रंथ, शिक्षण यांची विकासासाठी आवश्यकता असली तरी, खरे महत्त्व त्यांना नसून, स्वत:च्या मनाला नियंत्रणात ठेवण्याला आहे. आपल्याकडून कोणाचे नुकसान होऊ नये, कोणावर आघात होऊ नये, काया- वाचा- मन सत्कार्यात व सेवेत झिजवावे, याची फार आवश्यकता आहे. कोणाचाही द्वेष नसावा, पण व्यवस्था तर झाली पाहिजे. व्यवस्थेच्या दृष्टीने चोरी नजरेस आली तर, आपली श्रद्धा कायम ठेवूनदेखील चोर म्हणायला हरकत नाही. या दृष्टीने की, त्यात दुरुस्ती व्हावी! एका व्यक्तीमुळे समाज बिघडू किंवा सुधरू शकतो. सद्भावना निर्माण झाली नाही, तर इतरांना सुधारण्याइतका प्रभाव निर्माण होऊ शकत नाही. विकारी भूमिकेत विचार उत्पन्न होत नसतात.’’
‘‘हा दुष्ट आहे, याला नष्ट केले पाहिजे, हा सिद्धांत मानला तर ही गोष्ट सिद्ध होईल की, दुरुस्तीचा रस्ता कोठेच नाही! मग ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रति वाढो’ असे संत का म्हणतात? आज आपण दुष्टांना मारले तरी ते पुन्हा पुढे येतील. विषाचे झाड उपटून फेकण्याची गरज नाही; त्याचे बियाणेच उरणार नाही असा प्रयत्न केला तरच उत्तम सुधारणा होऊ शकेल. त्यासाठी आमच्या कार्यात सद्भावना असली पाहिजे! शत्रूंशी व सज्जनांशीदेखील विचारपूर्वक वागता आले पाहिजे! प्रश्न येतो व्यवस्थेचा. त्यासाठी विषारी बीज काढून टाकण्याचा प्रयत्न कसा करायचा? शब्दांनी समजावून देणे हाच सर्वप्रथम प्रयत्न ठरतो. पण लोकांमध्ये नुसत्या सांगण्याने सुधारणा होत नाही. संत तुकाराम, दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, म. गांधी इत्यादी थोर थोर महात्म्यांनी प्रयत्न केले. निष्कर्ष हाच निघाला की, शब्दांच्या पाठीशी सक्रियतेचा प्रभाव असला पाहिजे, तरच परिणाम होतो. आपण लोकांना सुधारण्याचा आवाज दिला; परंतु आपली ताकद सक्रियतेने त्यासाठी लावली नाही, ‘न म्हणे कोणासी उत्तम वाईट’ या भूमिकेतून प्रत्यक्ष कार्य केले नाही, तर परिणाम होणे शक्य नाही.’’
‘‘ज्यांना दुरुस्त करावयाचे, त्यांनाही सक्रियतेचा पाठ दिला पाहिजे. थोर महात्म्यांनी लोकांसमोर प्रत्यक्ष कार्य ठेवले; त्यांना कार्यास लावले. संतांनी नामाच्या गर्जना केल्या; भजन करा, ग्रंथ वाचा म्हणून सांगितले. आज नामाऐवजी प्रत्यक्ष कामाची शिकवण देऊन आचारशीलता वाढविण्याची गरज आहे. संतांनी पूजेचा पाठ दिला; लोक पूजा करू लागले. पण संतांनी जी आचारतत्त्वे सांगितली ती सर्वानी बाजूस सारली. काळाबाजार, सावकारी, लाचखाऊ अधिकारशाही सुरू केली.
महाराज ग्रामगीतेत लिहितात..
ग्रामगीता ग्रंथ वाचला।
तैसाचि गावी वर्तु लागला।
त्यासि शत्रुचि नाही उरला।
ग्रामामाजी कोणीहि।।
सामुदायिक वाढली वृत्ती।
सारे गाव त्याची संपत्ती।
ग्रामगीता घडवी मूर्ती।
ऐशा आदर्श मानवाची।।