राजेश बोबडे
सर्वच धर्म हे सर्व मानवांसाठी निर्माण झाले आहेत; सर्वाचा मौलिक आवाज एकच आहे. कोणताही धर्म मुळात या दुरवस्थेला जबाबदार नाही. समुद्र मनुष्याला वेगवेगळे मानतो काय? सूर्यचंद्राची किरणे भेदभाव करतात काय? विरोधच करायचा असेल, तर तो एका धर्माचेच नव्हे तर एका कुटुंबातीलही लोकही करू शकतात आणि अज्ञान व आकुंचित स्वार्थ हेच त्याचे कारण असू शकते, असे विचारपुष्प जपान येथे १९५५ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वधर्म व विश्वशांती परिषदेत गुंफले.
महाराज म्हणतात, ‘‘या सर्वास आणखी एक महत्त्वाचे मूळ कारण आहे. जबाबदार लोकांनी आपली जबाबदारी सांभाळली नाही म्हणून झगडे वाढले; तसेच धर्माचे सत्य स्वरूप समजाविणाऱ्यांची कार्यतत्परता कमी पडली, म्हणूनच संप्रदाय वाढले. धर्म हा विश्वाची धारणा करण्याचा उपयुक्त मार्ग आहे आणि ती धारणा त्यांच्याच द्वारे होऊ शकते जे ईश्वराचे विशाल स्वरूप जाणून, मानवाने कसे वागावे म्हणजे सर्वाना सुख लाभेल असा सर्वमान्य मार्ग समजावू शकतात. जे पुरुष येथे धर्माच्या नावावर राजकारणाचे डगले घालून आले असतील किंवा जे धन, सत्ता, बायका यांच्या मोहात बद्ध झाले असतील ते धर्माचे ज्ञान काय सांगणार? ईश्वराचा आवाज तर निर्मल पुरुषांच्या हृदयातच उठू शकतो. निर्मल आणि विशाल दृष्टीनेच आपण धर्माचा विचार नि प्रचार केला पाहिजे. धर्मवानांनी धर्माची बंधने मानवतावादी दृष्टिकोनातून वापरली नाहीत तर धर्म धर्मह्णच राहणार नाही. एका धर्माने दुसऱ्यावर आक्रमण करण्याची प्रवृत्ती धर्माची नाही, अधर्माची आहे. एका माणसाचा पाय बसविण्यासाठी दुसऱ्याचा पाय कापून काढणे हे जितके चुकीचे तितकेच दुसऱ्या धर्मावर आक्रमण करणे अन्यायाचे आहे. तलवारीने तलवारीला उत्तर देणे चूक आहे. तलवारीचा वार झेलण्यासाठी ढाल पुढे करण्यात येते, त्याप्रमाणे शांतता – बंधुप्रेमानेच आपण या विरोधी वृत्तीचा सामना केला पाहिजे.’’
‘‘जग नाना साधनांनी जवळ आणले आहे, त्याला प्रेमाच्या सूत्रात गुंफून यशस्वी व सुखी केले पाहिजे. सर्व धर्मीयांनी प्रेमाने सहकार्य करून आपल्या दबावाने क्रुरबुद्धीपासून सर्व देशांना परावृत्त केले पाहिजे. सर्व राष्ट्रांनी समजदारीने भावासारखे वागून जगात उच्च मानवतेची मूर्ती साकार केली पाहिजे.’’ तिसरे महायुद्ध टळू शकेल याची शक्यता वाटते का, या प्रश्नाला उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘सर्व राष्ट्रे समजूतदारपणे जवळ आली, परस्पर प्रेमभावना निर्माण करून सर्व राष्ट्रांनी सर्व राष्ट्रांचा विचार आपल्या बरोबरीने केला, मोठय़ा राष्ट्रांनी आक्रमक वृत्ती सोडून देऊन प्रत्येक देशातील लोकांच्या भावना विचारात घेतल्या आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वत्रयीवर प्रत्यक्षपणे सर्व राष्ट्रांना अनिर्बंध अंमल चालवू दिला, तर तिसरे महायुद्ध उद्भवण्याची मुळीच शक्यता नाही.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात-
विश्वीं होऊ शकेल शांतता।
तेथे गांवाची कोण कथा?
सामुदायिक प्रार्थनाच करील एकता।
नित्यासाठी, तुकडय़ा म्हणे॥