राजेश बोबडे
१९५५ मध्ये जागतिक विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानला गेले होते. तेथील जनतेची दिनचर्या जवळून न्याहाळली, त्या अनुभवाबद्दल महाराज म्हणतात, ‘‘जपान येथील साधुसंत, सरकार व जनता परस्परपूरक आहेत. ध्यानधारणा व प्रार्थना केल्यानंतर त्याच मंदिरांमधून विद्यालये, आरोग्यालये चालविण्याची जबाबदारी संत पार पाडतात. राष्ट्रीय वृत्तीची व नीतीची ज्योत सर्वाच्या हृदयात जागती ठेवतात. भारतात संस्कृत भाषेला आपण पारखे होत आहोत, पण तेथील लोक संस्कृतप्रेमी आहेत. आपल्या संस्कृत ग्रंथांतील महत्त्वाचे विचार आत्मसात करत आहेत. आपल्याकडे नीतिचर्चेला तोटा नाही, पण ती नीती व्यवहारात मात्र दिसेनाशी झाली आहे. तिकडे सर्वत्र इमानदारी आहे. रस्त्यावर पडलेल्या हजारोंच्या नोटाही तिथे कोणी चोरणार नाही, अशी उच्च नैतिक पातळी त्यांनी निर्माण केली आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सोयीचे काम दिले जाते आणि कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येत नाही. अशी रचना त्यांनी केली आहे.’’
‘‘आपण ‘सर्व ब्रह्ममयं जगत्’ म्हणून मोठमोठय़ाने गर्जना करतो, पण शेजाऱ्यांविषयींची आपुलकीही आपल्यात उरलेली नाही आणि तिथे मात्र सर्वाना एका दर्जाचे सुखी आयुष्य कसे घालविता येईल, याची प्रत्यक्ष व्यवस्था केली जात आहे. दहा घरांचे खेडेसुद्धा शहराची सुखे भोगीत आहे. ही गोष्ट बरोबर आहे की, जपान काही शतकांपासून स्वतंत्र देश आहे आणि आपल्या स्वातंत्र्याला आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रसेवेऐवजी कारकुनी करण्याचे शिक्षणच लोकांना जाणूनबुजून दिले जात असे आणि काही लोकांना तर तेसुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे भारताच्या समुद्रातील हिरे तसेच मातीत पडून राहिले आहेत. हे खरे असले तरी, भारतात उपदेशकांची, विद्वानांची आणि साधुसंतांची परंपरा आजपर्यंत कधीतरी बंद पडली आहे का? गावागावांतून व्यापलेल्या या लोकांनी जबाबदारी ओळखून लोकजागृतीचे कार्य केले असते तर भारताचा कायापालट व्हायला काय अडचण होती? तसे झाले असते तर, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जगाच्या पुढे असणारा भारत आज मागे राहिला नसता. परंतु या लोकांनी आपल्या लोकहिताच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे अनेक प्रकारची घातक विषमता समाजात वाढत गेली आणि परिणामी लोकांची मने दुभंगली. त्यांचा कार्याचा उत्साह मावळला, विलास व आळस वाढून खरी जीवनदृष्टी समजेनाशी झाली. झाले ते होऊन गेले. आतातरी ते सुधारण्याकडे सर्वानी एकदिलाने लक्ष पुरवायला नको का? आपापले आकुंचित व्यक्तित्व बाजूस ठेवून परस्परांना सहकार्य देण्याची वृत्ती भारतातून अनेक वर्षांपूर्वी कमी झाली होती; म्हणूनच हा देश आपसात लढून इंग्रजांचा गुलाम झाला होता. हे विचार सत्यनारायणाची पोथी समजून न ऐकता प्रत्यक्ष कार्यात आणण्यास प्रारंभ करणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक माणसाची शक्ती जागी करणे, ती देशाच्या उन्नतीसाठी वापरणे, यातच सर्वाचे कल्याण आहे.