‘‘राष्ट्राच्या उत्थानाला देशातील नि:स्पृह, चारित्र्यवान व धैर्यशील लोकच कारणीभूत होत असतात. राष्ट्राचे राष्ट्रीयत्व अशा लोकांनी केलेल्या प्रचारातच असते; अर्थात हेच लोक समाजात राष्ट्रीय भावना टिकवून ठेवीत असतात. राष्ट्रात विरक्त वृत्तीने पण लोकहिताच्या कळकळीने सत्य ज्ञानाचा व जीवनविषयक निर्भेळ दृष्टिकोनाचा प्रचार करणारे प्रचारक जोवर कर्तव्यतत्पर असतात तोवरच त्या राष्ट्राची इज्जत कायम असते’’ – हे सांगतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इशाराही देतात : ज्या दिवशी व्यक्तिगत सुखाच्या प्रलोभनात गुंतून किंवा सेवेची भावना शिथिल पडून हे नि:स्पृह प्रचारक आपले काम सोडून दुसऱ्या मार्गाला लागतात, त्या दिवसापासून राष्ट्र हे नकळत धुळीस मिळत जाते. म्हणूनच विरक्त व सुबुद्ध प्रचारकांची उज्ज्वल परंपरा राष्ट्रात अखंड जिवंत व जागृत असली पाहिजे. कारण, प्रचारक हेच ‘राष्ट्राची खरी स्मृती’ आहेत आणि ही स्मृतीच बिघडली तर ‘स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धीनाशात् प्रणश्यति’ याप्रमाणे राष्ट्राचा बुद्धिनाश होऊन त्याचा सर्वस्वी आत्मनाश होणे स्वाभाविक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराज म्हणतात : आपल्या भारतवर्षांचे असेच झाले आहे. यात प्रामाणिक उपदेशकांची, नि:स्पृह प्रचारकांची किंवा लोकहितैषी ज्ञानी पंडितांची परंपरा जोपर्यंत ऋषिआश्रमातून, तीर्थक्षेत्रातून, मठमंदिरातून कीर्तनपुराणादिकांद्वारे लोकजागृतीचे कार्य नि:स्पृहपणे पण आपुलकीने करीत होती तोपर्यंत, नाना विद्या व कलाकौशल्ये तसेच शौर्य हे राष्ट्रात इतक्या उत्कटतेने नांदत होते की सारे जग त्याकडे आदराने पाहत असे. परंतु स्वार्थ, अहंकार, अज्ञान व आळस यांनी प्रचारकांची ती परंपरा बिघडत जाऊन पुढे पुढे भ्रामक विचारच त्यांच्याकडून राष्ट्राला मिळत गेले. विरक्त प्रचारकांची परंपरा ही यासाठीच तत्त्वनिष्ठेने राष्ट्रात अखंड जिवंत असली पाहिजे. अर्थात ती जातीने, संप्रदाय पद्धतीने किंवा निव्वळ ‘गादी चालविण्या’च्या दृष्टीने मात्र जिवंत राहायला नको. तत्त्वापेक्षा कर्मठपणा, लोकहितापेक्षा आपले वैशिष्टय़, व्यक्तिस्तोम, जन्मजात उच्चता व सांप्रदायिकता याच गोष्टी या परंपरांच्या मुळाशी थैमान घालीत आहेत. त्यांच्या दूषित उपदेशातून समाजात भ्रम, कर्तव्यपराङ्मुखता, अंधश्रद्धा, उच्चनीचपणा, दैववाद, कर्मठवृत्ती, राष्ट्रसेवेबद्दल तिरस्कार इत्यादी गोष्टींचाच फैलाव झाला आहे व होत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक पंथ, संप्रदाय, संस्था, तीर्थक्षेत्रे, त्यांचे उपदेशक मी पाहिले; त्यांची उपदेशप्रणाली व आचारपद्धतीही मी लक्षात आणली; परंतु समाधानकारक अशी प्रचार परंपरा मला बहुधा कोठेच आढळली नाही.आढळलीच तर ती एकटय़ादुकटय़ा व्यक्तीत, जथ्यात मात्र नव्हे! म्हणूनच जातीने, संप्रदायाने वा गादी चालविण्याच्या दृष्टीने ज्या परंपरा चालविण्यात येतात त्यांचा, तत्त्वनिष्ठेच्या अभावी तीव्र निषेध मला करावयाचा आहे. कारण, आज मूळच्या तेजस्वी उपदेशकांच्या या गाद्या आळस व विलास यांनी सुस्त बनल्या आहेत; प्रचाराचे परिश्रम त्यांजकडून होईनासे झाले आहेत.
राजेश बोबडे