राजेश बोबडे
अमृतसर येथे १९५५ मध्ये अखिल भारतीय वेदान्त परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्म व साधुसमाजाबद्दल परखड विचार व्यक्त केले. महाराज म्हणतात, ‘‘माझ्या जीवनप्रवासातून मी पाहिले की, आजही जनतेच्या हृदयात धर्म व श्रद्धा ओतप्रोत भरलेली आहे. या श्रद्धेचा उपयोग करून धर्माच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मागे लोक माशांसारखे लागतात हा अनुभव येतो. या श्रद्धेला उचित वळण मात्र साधुसंतांनी लावायला हवे; तरच समाजातील उच्च ज्ञानाचे साफल्य होईल, असा माझा दृढ विश्वास आहे. मी धार्मिकतेचे दोन भाग मानतो. एक भाग व्यावहारिकतेचा व दुसरा पारमार्थिकतेचा, धार्मिकतेचा व्यावहारिकतेशी काडीचाही संबंध नाही, असे समजणारे अजूनही अंधारातच आहेत. व्यवहाराला झिडकारणारी धार्मिकता धार्मिकतेचे विडंबन तरी म्हणावे लागेल किंवा ही धर्माची कमजोरी तरी म्हणावी लागेल.’’
‘‘वस्तुत: व्यवहाराची स्थिती व रीती, नीती व पद्धती, मती आणि गती ऋषिमुनींनीच ठरविली आहे, प्रचारित केली आहे आणि व्यावहारिकांनाही सांगितली आहे. त्यांनीच ही गोष्ट या पद्धतीने जीवित ठेवली आहे. परंतु आज भारताची स्थिती इतकी खालच्या थराला पोहोचली आहे की, त्यात जर सुधारणा हवी व त्याचा भार साधुसंतांनीच उचलायला हवा, त्याशिवाय इतरांची ताकद उपयुक्त ठरणार नाही. संतांचा जनतेच्या श्रद्धा व धर्मपरायणतेशी निकटचा संबंध आहे. राष्ट्राचे नवनिर्माण यातूनच साधता येईल. देशाचीच नव्हे तर विश्वाची विसकटलेली घडी साधुसंत ठीक बसवू शकतात, पण ही गोष्ट अध्यात्माचे खरे अनुभवीच करू शकतात. ज्यांच्या आज्ञेचे पालन सरकारने करावे इतका मोठा अधिकार साधुसंतांचा आहे; पण आज या कल्पनेला साधुसंतांनी आपल्या विकृतीनेच खोटे ठरविले आहे. आपल्याला एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे, परंतु दु:खाने म्हणावे लागते की, आमची संस्कृती बरेचदा ग्रंथांतच लपून बसते. व्यवहाराकडे थोडी दृष्टी टाका. त्यात अधर्म जास्त बोकाळला आहे, हे असे का?’’
‘‘साधूंच्या स्तराचेच जर यावरून मोजमाप करायचे झाले, तर साधू प्रगतीच्या गतीने एक इंचदेखील वर चढलेले नाहीत, उलट खाली आले आहेत, असेच म्हणावे लागेल. भारतातील बहुसंख्य जनता, समाज व खेडी पाहा. त्यावरून म्हणता येईल की, आपला देश धार्मिक प्रगती करत आहे, याचा एकही पुरावा आपल्याला देता येत नाही. खेडय़ांत पक्षांनी बाजार मांडला आहे. राजकारणाने खेडय़ांचा तमाशा केला आहे. एकाच घरात बापाचा पक्ष वेगळा, आईचा वेगळा आणि मुलाचा तिसराच असा प्रकार आढळतो. माझ्या विचाराचा ओघ असा वाहतो की, लोकांनी संस्कृतीने चालत आलेले वैचारिक अध्यात्म आचरावे व राष्ट्रीयतेलाही उन्नत करावे. दोन्हीचे महत्त्व मी आज सारखेच मोजतो. दोन्हीची स्वतंत्र, व्यक्तिगत चर्चा हे मी एक ढोंग आणि सोंग मानतो.’’