राजेश बोबडे
सत्कर्तव्याची, धर्माची व तत्त्वज्ञानाची विचित्र दशा झालेली आहे. अगदी विचित्र, नकली व विपरीत कल्पना जनतेत दृढ झाल्या आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत लोकांना खरा मार्ग लाभून त्यांचे कल्याण कसे होणार हा गहन प्रश्न समोर उभा आहे आणि म्हणून आपल्याकडून त्या दृष्टीस अनुसरून जेवढी जनताजनार्दनाची सेवा होऊ शकेल तेवढी निष्काम भावनेने आणि प्रामाणिकतेने करावी. हे माझेच नव्हे तर ज्यांना ज्यांना लोकहिताची कळकळ असेल त्या सर्वाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यांनी सेवेच्या दृष्टीने तत्पर होऊन धर्म हा वेडगळ समजुतींचा किंवा आपमतलबी नाही, हे धर्मिनदक व धर्माभिमानी लोकांना पटवून देऊन आपापल्या परीने लोकांना सन्मार्गास लावले पाहिजे, असे तुकडोजी महाराज सांगतात.
धर्माच्या व धार्मिकांच्या दृष्टिकोनाची मांडणी करताना राष्ट्रसंत म्हणतात, ‘आज धार्मिक म्हणविणाऱ्या बहुतेक लोकांना साध्यासाध्या गोष्टींचेसुद्धा ज्ञान नसल्याचे पदोपदी प्रत्यंतर येते. समाजात १० माणसांशी कसे बोलावे व माणुसकीला अनुसरून टापटिपीने कसे राहावे हेसुद्धा अजून कळत नाही. आपण उद्योगाच्या क्षेत्रात प्रगती कशी करावी, आपल्यामध्ये सामुदायिकत्व कसे येईल, समाजाचा धर्म काय, शास्त्रांची दृष्टी कोणती, वर्णधर्म व मानवधर्म म्हणजे काय, मी कमावलेले धन केवळ माझे की माझ्या राष्ट्राचे, मी केवळ माझ्याकरिताच की समाजाकरिता याची निर्णायक जाणीव बहुधा आढळत नाही.
मी समाजात जातीने श्रेष्ठ ठरावा की गुणांवरून, गुरुमंत्र घेऊनच मला मुक्ती मिळू शकेल की काही आचरणही करावे लागेल, साधूंच्या पाया पडल्याने मी सुखी होईन की त्यांची पवित्र आज्ञाही पाळावी लागेल, थोरांचे सद्ग्रंथ नुसते पूजेकरिताच की अर्थ घेऊन तदनुसार वागण्याकरिता, माझा देव देव्हाऱ्यात की जगात, मी गोड बोलणे घरी किंवा मित्र मंडळीतच ठेवावे की माझ्या गडीमाणसांत आणि परक्या लोकांतही ठेवावे, माझा धर्म माझ्याकरिताच की विश्वाकरिता, माझे घर म्हणजे केवळ खाणावळ की सत्कर्माचे विश्रामधाम, देव सुंदर व श्रेष्ठ म्हणून पुजण्याकरिताच की तत्त्व घेऊन वागण्याकरिता, मारुतीची उपासना आरोग्य ब्रह्मचर्यादी गोष्टी अंगी आणण्याकरिता की पुत्र मागण्याकरिता, यावर विचार व्हायला हवा. आपले गाव केवळ वस्तिस्थान असावे की विद्या, कला, उद्योग व बाणेदारपणा इत्यादी गोष्टींच्या विकासाचे कर्तव्यक्षेत्र ठरावे वगैरे गोष्टींची यथार्थ माहिती समाजात अधिकांशाने दिसत नाही व जिथे काही दिसते तेथे प्रसार किंवा आचरण आढळत नाही. जिथे ती नसते तिथे गाजावाजा मात्र खूप अशीच स्थिती निर्माण झाली आहे. या सामाजिक उणिवांचा पूर्ण विचार करून त्या दूर करण्याकरिता पाय पुढे टाका, असे महाराज सांगतात. धर्मभोळय़ांना सन्मार्ग दाखविताना आपल्या भजनात महाराज म्हणतात, सन्मार्गाचा वैरी बरा, पण कुमार्गाचा मित्र नको।